मंगेश व्यवहारे, नागपूर: अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला काटोल तालुक्यातील डोंगरगाव व कन्हान पोलिस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता. याची माहिती बाल संरक्षण पथकाला मिळाली. पथकाने बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार बालविवाह थांबवण्याची कारवाई केली. बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनद्वारे जिल्हा बाल संरक्षण पथकाला मिळाली. त्यानंतर कारवाई करण्यात आली.
डोंगरगाव येथील मुलीचे वय १५ वर्षांचे होते. बाल संरक्षण पथक पोहोचण्यापूर्वी मुलीला हळद लागून मुलगी मंडपात येण्याच्या तयारीत होती. पाहुण्यांचे आगमन होत होते. स्वयंपाकही पूर्ण झाला होता. अशात बालसंरक्षण पथकाचे अधिकारी, कर्मचारी मंडपात धडकले व मुलीबाबत माहिती विचारू लागले. यादरम्यान, मुला-मुलीच्या नातेवाइकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मुलीची कागदपत्रे तपासली असता मुलगी १५ वर्षांची दिसून आली. तातडीने बाल संरक्षण पथकाने बंदपत्र तयार करून अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले व बालगृहात दाखल केले.
कन्हानमध्ये होणाऱ्या बालविवाहातील मुलगी १७ वर्षांची होती. तीदेखील विवाहबंधनात अडकण्यापूर्वी पथकाने कारवाई केली. दोन्ही कारवाया जिल्हा महिला बालविकास अधिकारी रणजित कुर्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण व पथकाद्वारे करण्यात आली.
मंडप डेकोरेशन, आचारी व डीजेवाल्यांना बजावली नोटीस
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच कायद्याचा धाक असणेही गरजेचे आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या कारवाईत मंडप डेकोरेशन, आचारी व डीजे चालकाला नोटीस बजावण्यात आली. यानंतर कुठल्याही लग्नाची ऑर्डर घेताना मुलीचे वय तपासून घेतल्यावरच ऑर्डर घ्यावी, अन्यथा एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.