नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - ३४ आयपीएस अधिकाऱ्यांसह राज्यातील ३९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निश्चित झाले आहे. या सर्वांना त्यांच्या पसंतीची तीन ठिकाणं (चॉईस) मागण्यात आली असून, सोमवारपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना ती द्यायची आहे. या घडामोडीमुळे बदलीसाठी इच्छुक असलेल्या राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी गुरुवारी राज्यातील ठिकठिकाणी दोन वर्षांचा आपला सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या ३३ अधिकाऱ्यांसह ३९ अधिकाऱ्यांची यादी संबंधित विभागप्रमुखांना पाठवली. त्यात पोलीस अधीक्षक, उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयु्क्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना ‘तुम्ही बदलून जाण्यासाठी कोणत्या शहराला प्राधान्य देणार, अशी विचारणा करून पसंतीक्रमानुसार ३ शहरांची चाईस द्या’, असे कळविण्यात आले आहे. सोमवारी २८ जूनपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना चॉईस कळवायचा आहे.
तीन ठिकाणांची पसंती कळवायची असली तरी अनेकांना एखादी विशिष्ट ठिकाणच (क्रीम पोस्ट) हवे असते. त्याचसाठी संबंधित अधिकारी जोर लावत असतो. त्यामुळे ‘ठिकाण एक आणि इच्छुक अनेक’, असा पेच निर्माण होतो. अशा ठिकाणी ‘ज्याचे वजन जास्त, त्याची निवड निश्चित’ असे सूत्रसमीकरण वापरून क्रीम पोस्टिंग केली जाते.
कोरोना संसर्गामुळे बदल्यांना ब्रेक लागला असातानाच चार महिन्यांपूर्वी बदली आणि वसुलीच्या मुद्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळे यंदा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया आस्तेकदम झाली. गेल्या महिन्यात सरकारने ३० जूनपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याची बदली होणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे फिल्डिंग लावणारे काहीसे संथ पडले होते. आता ३० जूनला तीनच दिवस बाकी उरले असताना पोलीस महासंचालनालयातून चॉईस लेटर जारी झाल्याने इच्छुकांची धावपळ अचानक वाढली आहे.
---
नागपुरातील तिघांची एसपीशिप पक्की
२०१४ च्या बॅचचे काही पोलीस अधिकारी असे आहेत, ज्यांचा २ वर्षांचा सेवाकाळ पूर्ण व्हायचाच आहे. मात्र, त्यांचेही नाव या यादीत आहे. त्यात नागपुरातील लोहित मतानी आणि डॉ. अक्षय शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांना अद्याप पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणून काम करायची संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता नागपुरातील पोलीस उपायुक्त नीलोत्पल (सेवाकाळ पूर्ण), लोहित मतानी आणि डॉ. अक्षय शिंदे तसेच मुंबईतील अन्य दोन अधिकाऱ्यांना यावेळी एसपीशिप पक्की मिळणार असल्याचे सांगितले जाते.
---