नागपूर : केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार नागपुरात कोरोना लसीकरण उपक्रमासंदर्भात तयारी सुरू झाली आहे. पहिल्या चरणात शहरातील शासकीय, निम्मशासकीय व मनपा इस्पितळातील डॉक्टर्स, नर्स, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. या तयारीच्या अनुषंगाने संबंधित इस्पितळांचे चिकित्सा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या सत्राची सुरुवात बुधवारी महाल येथील टाऊनहॉलमध्ये झाली.
लसीकरण कसे करायचे, कोणत्या जागेवर लावायची, स्थळावर सुविधा कोणत्या असाव्या, नागरिकांना केंद्रपर्यंत कसे आणावे आदींची माहिती यावेळी विशेषज्ञांनी दिली. सकाळी १० वाजता प्रशिक्षणास सुरुवात झाली. प्रास्ताविक चिकित्सा अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले. त्यांनी कोरोना संदर्भात उचललेली पाऊले व लसीकरण उपक्रमाबाबत माहिती दिली. डॉ. वैशाली मोहकर यांनी लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रेझेंटेशन केले. जागतिक आरोग्य संघटनेचे एसएमओ डॉ. साजीद खान यांनी व्हिडिओ व प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेची माहिती दिली. लसीकरणाबाबत संपूर्ण माहिती अपलोड करण्यासाठी को-विन ॲप तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी अश्विनी नागर यांनी दिली. रविल यादव यांनी कोल्ड चेन आणि लॉजिस्टिक मॅनेजमेंटवर मार्गदर्शन केले. डॉ. संजय चिलकर यांनी सुरक्षित लसीकरण व जैविक कचऱ्याचा निपटारा करण्यासाठीचे मार्गदर्शन केले. यावेळी टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन, सहायक चिकित्सा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी चिकित्सा अधिकाऱ्यांचे शंकानिरसन केले. याप्रसंगी सहायक चिकित्सा अधिकारी डॉ. विजय जोशी, नोडल ऑफिसर (संक्रामक रोग) डॉ. गोवर्धन नवखरे, समन्वयक दीपाली नागरे उपस्थित होते.