रंगेहाथ अटक : चार हजाराची मागितली होती लाचनागपूर : लाच घेताना पकडलेला ग्रामीण पोलीस हवालदार संतोष पवार याने वरिष्ठांच्या दबावामुळे लाच घेतल्याची माहिती दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संतोषला न्यायालयात सादर करून एका दिवसाची पोलीस कोठडी मिळविली आहे. संतोषला शनिवारी दुपारी एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संजय गायधने यांच्याकडून चार हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. गायधने रेतीची वाहतूक करतो. संतोष त्यांच्यापासून प्रत्येक ट्रकमागे एक-एक हजार रुपये मागत होता. संतोषच्या मते, चार महिन्यापासून त्याने पैसे दिले नव्हते. त्यामुळे त्याला १६ हजार रुपये द्यावे लागतील, असे संतोषने सांगितले. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे गायधने याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. मानकापूर क्रीडा संकुलाजवळ संतोषला पैसे घेण्यासाठी बोलविले. संतोष एका मित्रासोबत तेथे गेला. तो रुपये घेऊन निघून जात असताना ‘एसीबी’च्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो खाली पडला. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी अर्धा किलोमीटरपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष अडीच वर्षांपासून ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेत कार्यरत आहे. संतोषच्या मते उद्दिष्टपूर्तीसाठी नेहमी वरिष्ठांचा दबाव राहतो. त्यामुळे वाहनचालकांना तगादा लावावा लागतो. अवैध रेतीची वाहतूक होताना प्रत्येक ट्रकच्या मोबदल्यात वाहतूक विभागाला एक हजार रुपयांची लाच मिळत होती. रेती घाट उघडल्यामुळे अवैध रेतीच्या वाहतुकीत घट झाली. अधिकृत रेती असताना एक हजार रुपये देणे मालकांसाठी शक्य नाही. त्यांनी ही बाब संतोषला सांगितली होती. संतोषने काही ऐकण्यास नकार देऊन रुपयांसाठी अडून बसला होता. यामुळे गायधने यांना तक्रार करावी लागली. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलीस ‘एसीबी’च्या जाळ््यात
By admin | Updated: September 1, 2014 01:04 IST