बुटीबाेरी : भरधाव अज्ञात वाहनाने ट्रॅकरला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या ट्रॅकर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रुईखैरी शिवारात नुकतीच घडली. यशवीरसिंग गुलाबसिंग (५१, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) असे मृत ट्रॅकरचालकाचे नाव आहे. ताे यूपी-१५/बीटी-५९३१ क्रमांकाच्या ट्रॅकरने हैदराबादला जात हाेता. मात्र, तत्पूर्वी त्याने धाब्यावर जेवण केले आणि माेबाईल तिथेच विसरला. त्यामुळे ताे माेबाईल घेण्यासाठी ट्रॅकरने परत येत असताना भरधाव वाहनाने ट्रॅकरला जाेरात धडक दिली. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला बुटीबाेरी येथील रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक पाथाेडे करीत आहेत.
वाहनाच्या धडकेत ट्रॅकरचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST