नागपूर : रमजानचा तिसरा असरा सुरू आहे. या असऱ्याची पवित्र रात्र शब-ए-कद्र आज ९ मे राेजी साजरी केली जाईल. त्यानिमित्त आज मशिदींमध्ये कुराण पठन केले जाणार आहे. यावेळी काेराेनामुळे सरकारच्या गाइडलाइन्सनुसार मशिदींमध्ये चार ते पाच लाेकच नमाज अदा करू शकतील. यामध्ये मशिदींचे इमाम व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. दरम्यान, मुस्लीम बांधव काेराेनाचे नियम पाळून घरीच नमाज अदा करीत आहेत. शब-ए-कद्र निमित्त लाेक घरीच इबादत करणार आहेत. साेबतच ईद-उल-फितरचीही तयारी सुरू केली जाईल. उल्लेखनीय म्हणजे, बांधवांनी रविवारी रमजानचा २६ वा राेजा ठेवला आहे. आता ईदला केवळ तीन-चार दिवस शिल्लक आहेत. काेराेना महामारीचा प्रकाेप असल्याने, यावेळी माेमीनपुऱ्यातील ईद बाजार बंद आहे. मुस्लीम तंजिम आणि उलेमा संक्रमणापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे शक्यताे यावेळीही मुस्लीम बांधव साधेपणाने ईद साजरी करतील. परिस्थिती पाहून नागरिक ईदच्या तयारीला लागले आहेत. मदरसा जामिया अरबिया इस्लामियाचे संचालक मुफ्ती अब्दुल कादीर खान यांनी सांगितले, या पवित्र रात्रीचे इस्लाममध्ये महत्त्व आहे. मात्र, या पवित्र रात्री घरीच इबादत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शब-ए-कद्र आज, घराघरात हाेणार इबादत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST