नागपूर : टिप्परचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका चिमुकल्यासह त्याच्या मातेला चिरडले. ८ सप्टेंबरला सकाळी ११.३० ते ११.४५ दरम्यान कामठी मार्गावर घडलेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला, रात्रीपर्यंत तो तसाच होता. दरम्यान, संतप्त जमावाने मायलेकाचे बळी घेणाऱ्या टिप्परवर तूफान दगडफेक करून नंतर तो पेटवून दिला तर, टिप्परच्या क्लिनरची बेदम धुलाई केली. पिवळी नदी, गणेश उद्यान परिसरात अमोल गोंदुर्ले आपल्या परिवारासह राहतो. तो फोटोग्राफर आहे. बाजूच्या भागात दर मंगळवारी रॉकेल विक्रेता येतो. घरातील रॉकेल संपल्यामुळे ते घेण्यासाठी अमोल, त्याची पत्नी रजनी (वय ३०) तसेच मानव (वय ५) आणि मन (वय २० महिने) या मुलांसह भंते आनंद कौसल्यायननगराकडे निघाले. अमोलने मानवचा हात पकडला होता. तो पुढे चालत होता तर, मागे चिमुकल्या मन याला घेऊन रजनी जात होती. अचानक कामठी मार्गाने आलेल्या टिप्परने (एमएच ३१/ डीसी २८९८) रजनी आणि तिच्या कडेवरील मन याला चिरडले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून अमोलने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला रजनी रक्ताच्या थारोळ्यात तडफडताना दिसली. वर्दळीचा मार्ग आणि सकाळची वेळ असल्यामुळे परिसरातील मंडळीही धावली. मात्र, आरोपी चालकाने संधी साधून टिप्परमधून उडी घेऊन पळ काढला. संतप्त जमावाने टिप्परच्या क्लिनरला खाली ओढून बेदम धुलाई केली. टिप्परवर तूफान दगडफेक केली तर, काहींनी डिझेलची टँक फोडून टिप्पर पेटवून दिला. अन् घात झाला...नागपूर : कामात काम आटोपण्याच्या लगबगीतून रजनी आणि मन यांचे बळी गेले. घटनेच्या काही वेळेपूर्वी एकटा अमोलच रॉकेल आणायला निघाला होता. मात्र, त्याच भागात एका महिलेकडे काम असल्यामुळे सोबतच जाऊन दोन्ही कामे आटोपू, या भावनेने हे चौघे तिकडे निघाले आणि त्याचमुळे घात झाला. अमोलची अवस्था वेड्यागतडोळ्यादेखत झालेल्या भीषण अपघातातील पत्नी आणि चिमुकल्याची अवस्था पाहून अमोलचे स्वत:वरील नियंत्रण सुटले. तो आरडाओरड करून टिप्परचालकाकडे धावला. चालकाने गती वाढवल्यामुळे तो क्लिनरच्या दिशेने ट्रकवर चढला आणि क्लिनरला ओढण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, चिमुकला मानव रस्त्यावर एकटा असल्याचे ध्यानात आल्यामुळे नंतर तो परत फिरला आणि मानवला जवळ घेऊन वेड्यागत रडू लागला.(प्रतिनिधी)
टिप्परचालकाने मायलेकाला चिरडले
By admin | Updated: September 9, 2015 03:01 IST