चप्पल फेकणे ही विदर्भाची संस्कृती आहे का?

By admin | Published: August 23, 2014 03:00 AM2014-08-23T03:00:38+5:302014-08-23T03:00:38+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चामोर्शीच्या सभेत चप्पल फेकणाऱ्या महिलेचा ‘विदर्भ कनेक्ट’या विदर्भवादी संघटनेने परवा नागपुरात सत्कार केला.

Throwing of sandals is Vidarbha's culture? | चप्पल फेकणे ही विदर्भाची संस्कृती आहे का?

चप्पल फेकणे ही विदर्भाची संस्कृती आहे का?

Next

गजानन जानभोर
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चामोर्शीच्या सभेत चप्पल फेकणाऱ्या महिलेचा ‘विदर्भ कनेक्ट’या विदर्भवादी संघटनेने परवा नागपुरात सत्कार केला. तिला व तिच्या पतीला चळवळीसाठी आर्थिक मदतही देण्यात आली. (ही ‘रसद’ विदर्भ आंदोलनासाठी की चपला फेकण्याच्या कामासाठी पुरवण्यात आली?) ‘मैने चप्पल क्यो मारी?’ हा या सत्कार समारंभाचा विषय होता. समारंभ आयोजित करणाऱ्या संघटनेत नागपुरातील प्रख्यात वकील, उद्योजक आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. श्रीहरी अणे होते. ‘उपमुख्यमंत्र्यांवर चप्पल फेकण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली’? हाच साऱ्यांच्या कौतुकाचा प्रश्न सत्कारमूर्ती शोभाताई म्हस्के यांना होता. शोभातार्इंनी प्रश्नाचे उत्तर दिले की टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि मंडळी एकमेकांकडे पराक्रमी अविर्भावाने बघायची. सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवली जाणारी माणसे विवेकभ्रष्ट झाली की कशी वागतात, याचे प्रत्यंतर या कार्यक्रमात पदोपदी येत होते. आपण हिंसेचे समर्थन करीत आहोत आणि नकळत त्याला प्रोत्साहन देत आहोत, याचे भानही या मान्यवरांना राहिले नाही. चप्पल फेकणे हे स्त्रीशक्तीचे प्रतीक कसे? त्याचे उदात्तीकरण करून आपण अहिल्याबाई,सावित्रीबाईचा अपमान करीत आहोत, ही जाणीवही या सुज्ञ मंडळींना राहिली नाही.
विदर्भ राज्य झालेच पाहिजे, ही साऱ्यांचीच मागणी आहे. अलीकडच्या काळात या चळवळीवर आलेली मरगळ झटकण्याचे काम ‘विदर्भ कनेक्ट’ने केले आहे, ही बाबही इथे नोंदवायला हवी. परंतु या मागणीसाठी नेत्यांवर चप्पला फेकून विदर्भ राज्य मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. अजित पवार असोत किंवा कुठलाही नि:शस्त्र माणूस, त्याच्यावर चप्पल फेकणे हा पराक्रम कसा? त्यातून विदर्भाचा अभिमानच प्रकट होतो असे वाटत असेल तर त्याएवढा विदर्भाचा दुसरा अपमान नाही. ही विदर्भाची संस्कृतीही नाही. मनोवृत्ती तर अजिबात नाही. असा उथळपणा करणाऱ्या माणसांना प्रसिद्धी मिळत असली तरी या प्रसिद्धीचे नाते गोडसेच्या प्रसिद्धीशी आहे, ही गोष्ट ते कधी लक्षात घेत नाहीत.
उपमुख्यमंत्र्यांवर चप्पल फेकली म्हणून या मंडळींनी त्या महिलेचा सत्कार केला़ उद्या जर कुणी याच कारणासाठी गोळ्या झाडल्या तर त्याचा कस्तूरचंद पार्कवर सत्कार करतील का?
या महिलेच्या हिंसक आणि कायद्यात न बसणाऱ्या कृतीचे अ‍ॅड़ श्रीहरी अणे यांंच्यासारखा कायदेपंडित जर समर्थन करीत असेल तर तो कायद्याचा व सभ्यतेचाही अपमान आहे़ चप्पल फेकण्याने जर वेगळा विदर्भ मिळाला असता तर लोकनायक बापूजी अणे यांनी चपलाच फेकण्याचे काम केले असते़ बापूजी अणे यांच्यात असलेली सभ्यता किमान त्यांच्या नातवाने पाळावी, ही वैदर्भीयांची अपेक्षा चुकीची कशी म्हणता येईल?
अ‍ॅड़ अणेंनी आपल्या भाषणात उपस्थितांना गांधी समजावून सांगितला. आपण गांधी विचारांचे पाईक आहोत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले़ परंतु गांधीजी असे म्हणाले होते की, ‘हिंसेने स्वातंत्र्य मिळणार असेल तर मला स्वराज्यही नको आहे़’ मग गांधीजींशी वैचारिक नाते सांगणाऱ्या अणेंनी या हिंसक कृत्याला प्रोत्साहन देताना त्याचे भान ठेवूनये का? या सत्कार समारंभात त्या महिलेचे पती भाऊराव मस्के यांनी तर कहरच केला़ त्यांच्या भाषणातील भाषा गावगुंडाला शोेभेल, अशीच होती़ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल अत्यंत हीन उद्गार काढताना यशवंत स्टेडियमला दिलेले त्यांचे नाव पुसून काढा, अशी मागणी या माणसाने केली़ यशवंतराव चव्हाणांना घातलेल्या शिव्यांशी विदर्भ कनेक्ट किंवा अ‍ॅड़ अणे सहमत आहेत का हे वैदर्भीयांना कळायला हवे़ यावेळी या महिलेच्या पतीने उपस्थितांना अशी विनवणी केली की, ‘साहेब, येत्या विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार आहे़ मला पाठिंबा द्या. मला एकदा आमदार कराच.’ मग ही चप्पलफेक खरंच विदर्भ राज्यासाठी होती की आमदार बनण्यासाठी, याचा उलगडा व्हायला नको का?
विदर्भ चळवळीची हीच शोकांतिका आहे़ विदर्भातील प्रत्येक नागरिकाला विदर्भ राज्य हवे आहे़ परंतु या चळवळीच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास नाही़ ज्यांच्या हातात नेतृत्व सोपविले ते बेईमान झाले़ आंदोलने करायची आणि आमदारकी, खासदारकी मिळाली की वेगळया विदर्भाची मागणी विसरायची, हा विश्वासघाताचा खेळ वर्षानुवर्षे सुरू आहे़ परंतु अलीकडच्या काळात वैदर्भीय जनतेने मागचे सारे काही विसरून पुन्हा या चळवळीत सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे़ काही महिन्यांपूर्वी ‘जनमंच’ या स्वयंसेवी संंघटनेने घेतलेल्या जनमत चाचणीला साऱ्यांनीच एकमुखी कौल दिला. परंतु याच जनमंचचे ज्येष्ठ कार्यकर्ते राम आखरे यांनी परवाच्या सत्कार समारंभात विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शविली़ मग ही जनमत चाचणी निवडणूक लढविण्याची ‘चाचपणी’ तर नाही ना, अशी शंका कुणी घेत असेल तर ती चुकीची कशी म्हणता येईल?
सभ्य आणि सुसंस्कृत समाजात चप्पल फेकणे हे हिंसक कृत्य मानले जाते़ भारतीय दंड विधानात असे कृत्य करणाऱ्यासाठी शिक्षेची तरतूदही आहे़ मग असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार करताना या वकील मंडळींना कायद्याचा विसर पडला का, असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे़ तुम्ही कायद्याचे रक्षण करण्यास सक्षम आहात, न्यायप्रिय समाजाची धुरा तुम्ही सांभाळू शकता हा विश्वास न्यायसंस्थेला असल्यामुळेच तुम्हाला वकिलीची सनद देण्यात आली आहे़ मग हिंसेचे समर्थन करून तुम्ही न्यायसंस्थेच्या विश्वासाला तडा देत नाही का? असा प्रश्न या वकील मंडळींना कुणीतरी विचारायला हवा.
कुठल्याही चळवळीची वाटचाल ही विवेकाच्या मार्गाने पुढे न्यावी लागते़ चळवळीचे साध्य ठरविताना त्याच्या साधनांचाही शोध चळवळीच्या कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे़ चपला फेकल्यामुळे चळवळी यशस्वी झाल्या असत्या तर चपलांच्या सरणावर ब्रिटिश राज्याची होळी करून एका क्षणात स्वातंत्र्य मिळवता आले असते़ पण तसे होत नसते़ यातून शांतताप्रिय, अहिंसक व लोककल्याणकारी राज्य निर्माण होत नाही. चप्पल फेकणे हे स्वतंत्र्य विदर्भ राज्याच्या चळवळीचे साध्य नाही आणि असे हिंसक कृत्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हे साधनही नाही, हाच या सत्कार समारंभाचा खरा बोध आहे.

Web Title: Throwing of sandals is Vidarbha's culture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.