मेडिकलमध्ये संविधान दिन साजरा
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आज संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गांवडे, मेट्रन वैशाली तायडे यांच्यासह विविध विभागातील डॉक्टर, परिचारिका यांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन केले. डॉ. मित्रा व डॉ. गावंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कचरागाडीची वेळ बदलण्याची मागणी
नागपूर : नवीन बाबुळखेडा गल्ली नं. १९ मधून घराघरांमधून कचरा उचलणाऱ्या गाडीची वेळ सकाळी ६.३० वाजताची आहे. परंतु कचरागाडी वेळेवर येत नाही. यामुळे नागरिकांवर झोपमोड करून प्रतीक्षेची वेळ येते. काही नागरिक गाडीची वाट न पाहता रस्त्यावर कचरा टाकून मोकळे होतात. गाडीचे डिझेल सकाळी भरले जात असल्याने गाडी उशिरा येत असल्याचे चालकाचे म्हणणे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या भागातील कचरागाडीची वेळ बदलण्याची मागणी आहे. विशेष म्हणजे, पूर्वी या भागातील गाडीची वेळ सकाळी ८ वाजताची होती.