तीन वर्षांनी नागपुरात 'इंडियन सायन्स काँग्रेस' : सिद्धार्थविनायक काणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 08:58 PM2020-02-13T20:58:37+5:302020-02-13T23:31:37+5:30

विद्यापीठाच्या शतकपूर्तीच्या वर्षात म्हणजेच तीन वर्षांनी नागपुरात ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे आयोजन होईल. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नदेखील सुरू केले आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

Three years later 'Indian Science Congress' in Nagpur: Siddharth Vinayak Kane | तीन वर्षांनी नागपुरात 'इंडियन सायन्स काँग्रेस' : सिद्धार्थविनायक काणे

तीन वर्षांनी नागपुरात 'इंडियन सायन्स काँग्रेस' : सिद्धार्थविनायक काणे

Next
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठात ‘आयसीएपीसीएम’चे उद्घाटन

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कुठल्याही विद्यापीठासाठी ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे आयोजन करणे ही गौरवाची बाब असते. २०१८ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ही संधी प्राप्त झाली होती. परंतु वेळ फारच कमी असल्याने ते शक्य होऊ शकले नव्हते. परंतु आता विद्यापीठाची तयारी असून विद्यापीठाच्या शतकपूर्तीच्या वर्षात म्हणजेच तीन वर्षांनी नागपुरात ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे आयोजन होईल. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नदेखील सुरू केले आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमधील प्रगती व नव्या संशोधनांवर आयोजित ‘आयसीएपीसीएम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भारती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. माणिकराव साळुंखे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर ‘आयसीएपीसीएम’चे अध्यक्ष जी.एस. खडेकर व कार्यकारी अध्यक्ष तसेच प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी, ‘इनोव्हेशन-इन्क्युबेशन’ संचालक डॉ. राजेश सिंह, ‘एलआयटी’चे संचालक डॉ. राजू मानकर हेदेखील उपस्थित होते. २०१८ साली हैदराबाद येथे ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. परंतु ऐनवेळी काहीतरी अडचण आल्याने आयोजकांनी नागपूर विद्यापीठाला संपर्क केला होता व आयोजन करण्यासंदर्भात विचारणा केली होती. अवघ्या एका महिन्यात इतके मोठे आयोजन करणे शक्य नव्हते, असाच निर्वाळा सर्व अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे त्यावेळी संधी हुकली. परंतु आता विद्यापीठाची पूर्ण तयारी आहे. तीन वर्षांनी विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. यानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील व ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चेदेखील आयोजन व्हावे यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत, असे कुलगुरूंनी सांगितले. डॉ. खडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मनीषा जोशी व डॉ. प्रियंका वर्णेकर यांनी संचालन केले, तर डॉ. विजय तांगडे यांनी आभार मानले. ही परिषद १६ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून विद्यापीठाचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी विज्ञान आणि संगणक विज्ञान पदव्युत्तर विभाग तसेच ‘एलआयटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातून ८५० हून अधिक प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत.

आंतरशास्त्रीय संशोधनावर भर हवा
आपल्या देशात दर्जेदार संशोधनाची कमतरता आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्याकडे संशोधन हे एकाच विद्याशाखेपुरते मर्यादित राहते. व्यक्ती म्हणून आपल्याकडे अनेक चांगले संशोधक आहेत. परंतु समूह म्हणून संशोधन करण्यात ते मागे पडतात. विविध शास्त्रांना एकत्रित जोडणाºया संशोधनांची समाजाला आवश्यकता आहे. त्यामुळे संशोधकांमध्ये आंतरशास्त्रीय संशोधनाचा दृष्टिकोन निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन प्रा. माणिकराव साळुंखे यांनी केले. गणिताच्या प्राध्यापकांना रसायनशास्त्राचे नोबेल मिळाल्याचे उदाहरणदेखील त्यांनी दिले. 

पावणेदोन महिन्यांअगोदरच कुलगुरूंना ‘फेअरवेल’
कुलगुरू डॉ. काणे यांच्या कार्यकाळातील ही शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय परिषद ठरू शकणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. सर्वसाधारणत: निरोपाच्या प्रसंगी कुलगुरुंचा सत्कार करण्यात येतो. परंतु निवृत्तीला काही आठवडे बाकी असल्याची बाब लक्षात घेत आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान आयोजन समितीतर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रत्येक कार्यक्रमाची विस्तृत रूपरेषा मला अगोदर कळविणे मी अनिवार्य केले आहे. परंतु या कार्यक्रमाची रूपरेषा मला कळविण्यातच आली नाही. हे माझ्यासाठी मोठे ‘सरप्राईज’ ठरले, अशी भावना कुलगुरूंनी व्यक्त केली.

Web Title: Three years later 'Indian Science Congress' in Nagpur: Siddharth Vinayak Kane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.