कवडकच्या नागरिकांचे न.प.प्रशासनाला निवेदन
रामटेक : सोनेघाट ग्रा.पं.चे रामटेक शहराला लागून असलेले कवडक, दुधाळा आणि इंदिरानगर हे तीन वॉर्ड नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी कवडक येथील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांना निवेदन सादर केले आहे. यासोबतच ग्रामपंचायत सदस्या भिवगडे यांनीही नगर परिषदेकडे हे वाॅर्ड रामटेक न.प.च्या हद्दीत समाविष्ट करावे अशी मागणी केली आहे. रामटेकचा विकास आराखडा २००१ ला नगर विकास विभागाने मंजूर केला होता. तेव्हा कवडक, दुधाळा, इंदिरानगर हे वॉर्ड रामटेक न.प.ला जोडायचे होते. पण गत १९ वर्षात न.प.प्रशासनाने यावर कोणतेही कारवाई केली नाही. या वॉर्डाचा मालमत्ता कर ग्रामपंचायत जमा करत होती. पण आता न.प.ने ग्रा.पं.ला पत्र पाठवित या वॉर्डातील कर वसुल करू नये असे सांगितले आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने मात्र नियमावर बोट ठेवत याला विरोध दर्शविला आहे. उपरोक्त वॉर्ड आधी न.प.मध्ये समाविष्ट करण्यात यावे. यासंदर्भात शासनाने आदेश काढावा अशी ग्रामपंचायतची भूमिका आहे. आज झालेल्या न.प.च्या सभेत हे वॉर्ड रामटेक न.प.ला जोडावे असा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती न.प. सदस्य दामोधर धोपटे यांनी दिली.