नागपूर : मनोज मालवीय डेव्हलपमेंट सेंटरच्या (एमएमडीसी) माहितीनुसार मागील २० वर्षांत देशातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात महाराष्ट्रातील ७२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. एमएमडीसी सेंटरने शेतकऱ्यांच्या या आत्महत्या रोखण्यासाठी एक प्रोजेक्ट तयार केला आहे. शिवाय तो देशभरात लागू करण्याची केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे. ‘आम्ही सर्व शेतकरी स्वत:च्या परिश्रमाने बनणार करोडपती’ असे या प्रोजेक्टचे नाव असून, त्याचा गुरुवारी संविधान चौकात शुभारंभ करण्यात आला. या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत केले जाणार आहे. शिवाय त्यांना प्रशिक्षणही दिले जाईल. संस्थेचे प्रमुख मनोज मालवीय यांच्या मते, प्रत्येक वर्षी देशातील १५ हजारापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करतात. मागील १९९५ ते २०१५ पर्यंत तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एनएसएसओ-२०१४ च्या अहवालानुसार शेतीतून शेतकऱ्याच्या कुटुंबाला केवळ ३ हजार १०० रुपयांचे उत्पन्न मिळत असून, महागाईच्या तुलनेत ते फार कमी आहे. मागील काही वर्षांत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात १२० पटीने वाढ केली आहे. तसेच शिक्षकांच्या पगारात ३२० पटीने वाढ झाली असून कार्पोरेट क्षेत्रातील लोकांचा पगार सात पटीने वाढला आहे. या उलट शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीत केवळ १९ पटीने वाढ झाली आहे. १९७० मध्ये गव्हाचे किमान आधारभूत मूल्य ७६ रुपये प्रति क्विंटल होते, ते आज केवळ १४५० रू पयापर्यंत पोहोचले आहे. ही तफावत दूर करण्यासाठी संस्थेतर्फे प्रोजेक्टमध्ये काही सूचना केल्या असल्याचे यावेळी मालवीय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)