लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सोमवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. अधिवेशनादरम्यान अतिरेकी किंवा राष्ट्रविघातक शक्तींकडून बॉम्बस्फोट घडवण्यासाठी वाहनांचा उपयोग करण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही, असे पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनांमध्ये नमूद आहे. त्यामुळे विधानभवनाजवळील अनेक मार्गांवर बाहेरील वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ कडेकोट बंदोबस्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी परिसरात अधिवेशन काळात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तयार करण्याचे नियोजन केले आहे. या मार्गावर वाहनांना प्रवेशासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. वेकोली किंवा जपानी गार्डन चौकातून रामगिरी टी पॉइंट मार्गे पोलीस जिमखानाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांना प्रतिबंध असेल.