रेवराल : मौदा तालुक्यातील धानला आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार ग्रामीण भागातील ४५ वर्षांवरील नागरिक लसीकरणासाठी केंद्रावरही येत आहेत. मात्र या केंद्रावर प्रशासनाकडून लसीकरणाबाबत योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांकडून कोराेना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
मौदा तालुक्यात कोरानाचे संक्रमण वाढत आहे. आतापर्यंत तालुक्यात ११३४ नागरिक बाधित झाले आहेत. अशात ग्रामस्थांना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात येत आहे. धानला येथील आरोग्य उपकेंद्रावर धानला, पिपरी, खंडाळा, चारभा, दहेगाव, सुंदरगाव, चिचोली, मांगली या गावातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. येथे सकाळी ८ वाजतापासून लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र या केंद्रावर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. अशात ऊन वाढत असल्याने नागरिक सावलीचा आधार घेत एकत्र बसत आहेत. यात अनेकांच्या तोंडाला मास्क दिसून येत नाही. त्यामुळे या केंद्रावरूनच संक्रमण वाढणार तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या लसीकरण केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.