शुद्ध मध म्हणून तुम्ही चाखता निव्वळ साखरेचे पाणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 10:33 AM2021-08-12T10:33:10+5:302021-08-12T10:51:52+5:30

Nagpur News ‘एफडीए’च्या तपासण्यांमध्ये देशातील ८०-८५ टक्के ब्रँडस‌्च्या मधामध्ये भेसळ आढळून आली असल्याने विभागातर्फे राज्यभर मधाची गुणवत्ता तपासण्यासाठी माेहीम राबविली जात आहे.

Is there pure honey in the country? 80% brand adulterated | शुद्ध मध म्हणून तुम्ही चाखता निव्वळ साखरेचे पाणी..

शुद्ध मध म्हणून तुम्ही चाखता निव्वळ साखरेचे पाणी..

Next
ठळक मुद्देभारतात सुविधा नसल्याचा घेतात फायदा

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र अन्न व औषधी प्रशासनाने दाेन दिवसांत राबविलेल्या कारवाईने मधविक्रेत्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, त्याहीपेक्षा सामान्य ग्राहकांच्या भरवशाला तडा जाताे आहे. ‘एफडीए’च्या तपासण्यांमध्ये देशातील ८०-८५ टक्के ब्रँडस‌्च्या मधामध्ये भेसळ आढळून आली असल्याने विभागातर्फे राज्यभर मधाची गुणवत्ता तपासण्यासाठी माेहीम राबविली जात आहे.

एफडीएने सर्व ब्रँडचे मधनिर्माता, विक्रेता व वितरकांकडून ८६ सॅम्पल गाेळा करून एनएमआर तपासणीसाठी जर्मनीला पाठविले हाेते. त्यांपैकी ५२ कंपन्यांचे सॅम्पल भेसळयुक्त आढळून आले आहेत; तर उर्वरित नमुन्यांचे रिपाेर्ट येणे बाकी आहे. विभागाने त्यानुसार ३६.१९ लाख रुपयांचा ३४८०.२५ किलाे मधाचा स्टाॅक जप्त केला आहे. या नमुन्यांमध्ये मॅनाेज, माल्टाेज, माल्टाेट्राईज ही शर्करामिश्रित भेसळ आढळली आहे. याचे मानवी आराेग्यावर विपरीत परिणाम हाेतात. यामध्ये माेठमाेठ्या कंपन्यांच्या ब्रँडचाही समावेश आहे. एफडीएने फूड सेफ्टी ॲन्ड स्टँडर्ड ॲक्टनुसार मधनिर्माता, विक्रेता व वितरकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. सामान्य ग्राहकांपुढे शुद्ध मधाचा भरवसा काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

कशी हाेते भेसळ?

- साधारणत: मधाचे दाेन स्राेत आहेत. जंगलातून गाेळा हाेणारे मध व मधमाश्या पालकांकडून तयार हाेणारे मध.

- जंगलातील मध एका नाही तर अनेक व्यक्तींकडून घेतले जातात. दिवसेंदिवस मधमाश्या घटत आहेत. त्यामुळे कमी मध गाेळा झाल्यावर नफा कमावण्यासाठी भेसळ केली जाते. वैयक्तिक स्तरावर हाेणारी भेसळ शाेधणे अशक्य असते.

- जंगलातील मध गरम करून स्टाेअर केला जातो, ज्यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म नष्ट हाेतात.

- मधमाश्या पालकांकडे भेसळीचे प्रकार आहेत. आसपास फुलांची उपलब्धता नसली तर अधिक उत्पादन व्हावे म्हणून मधमाश्यांना साखरपाणी दिले जाते.

- राणीमाशीने अधिक मध द्यावा म्हणून ॲन्टिबायाेटिक्सचाही उपयाेग केला जाताे.

- मध काढण्यासाठी लाेखंडी यंत्राचा वापर केला जाताे. त्याला अनेकदा गंज चढलेला असताे. त्यामुळे गुणवत्ता घसरण्याचा धाेका. मध गाेळा करण्यासाठी डालडा किंवा तेलाच्या पिंपामधूनही भेसळ हाेते.

 

कंपन्यांद्वारे हाेणारी भेसळ

- साखर किंवा गुळाचे मिश्रण करण्याची पद्धत कालबाह्य झाली आहे; कारण ही भेसळ साध्या टेस्टमध्ये पकडली जाते.

- कंपन्यांत आता राईस सिरप, मका सिरपचा उपयाेग हाेताे. काही टेस्टमधून ती लक्षात येत असल्याने आता बीटरूट सिरपचा वापर वाढला आहे.

- काही माेठ्या कंपन्यांकडे आधुनिक प्रयाेगशाळा आहेत; पण त्यांचा उपयाेग भेसळ करण्यासाठी किंवा लपविण्यासाठी हाेताे.

भारतात नाही प्रयाेगशाळा

मधमाश्या अभ्यासक व नेचर्स बझ संस्थेचे प्रणव निंबाळकर यांनी सांगितले, भारतात मधातील भेसळ शाेधण्यासाठी सी-३ व सी-४ टेस्ट उपलब्ध आहे. या टेस्टद्वारेही शिताफीने हाेणारी भेसळ शाेधणे अशक्य हाेते. सर्व प्रकारची भेसळ शाेधण्यासाठी एनएमआर टेस्टची आवश्यकता आहे; पण ही प्रयाेगशाळा भारतात नाही. जर्मनीहून चाचण्या करून आणाव्या लागतात. उल्लेखनीय म्हणजे एफएसएसआयच्या स्टँडर्डनुसार एनएमआर टेस्ट बंधनकारक नाही व याचाच फायदा कंपन्या घेत असल्याचे ते म्हणाले. पाण्यात टाकून पाहणे, कागद किंवा कापडावर मध टाकून बघणे, या पारंपरिक पद्धती कुचकामी असल्याचेही प्रणव यांनी स्पष्ट केले.

सामान्य ग्राहकांना समजणे अशक्य

पाण्यात टाकून पाहणे, कागदावर किंवा कापडावर टाकणे, आदी पारंपरिक पद्धतीने मधाची शुद्धता ओळखता येत असल्याचा दावा केला जाताे. मात्र तज्ज्ञांच्या मते, या पद्धती १०० टक्के विश्वासार्ह नाहीत. प्रयाेगशाळेत एनएमआर चाचणी केल्याशिवाय मधाची गुणवत्ता ओळखणे अशक्यच आहे. त्यामुळे परिचित मधमाश्या पालकांकडूनच मध घेणे विश्वासार्ह ठरू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Is there pure honey in the country? 80% brand adulterated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न