नोटीसला सावकार मोजतच नाही

By admin | Published: April 6, 2016 03:23 AM2016-04-06T03:23:57+5:302016-04-06T03:23:57+5:30

राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे संतप्त झालेल्या सावकारांकडून चक्क अधिकाऱ्यांच्या नोटीस केराच्या टोपलीत फेकण्यात येत असल्याचा आरोप कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

There is no counting of lenders | नोटीसला सावकार मोजतच नाही

नोटीसला सावकार मोजतच नाही

Next

शेतकऱ्यांचा आरोप : कर्जमाफी योजनेपासून वाचण्यासाठी विविध क्लृप्त्या
नागपूर : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे संतप्त झालेल्या सावकारांकडून चक्क अधिकाऱ्यांच्या नोटीस केराच्या टोपलीत फेकण्यात येत असल्याचा आरोप कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणीसाठी आलेल्या पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली फिर्याद मांडली. नियमानुसार पैसे घेऊन शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेले सोने परत करण्यासदेखील सावकार चालढकल करीत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी सावकारांद्वारे होणाऱ्या अत्याचारांबाबत ज्या गोष्टी सांगितल्या, त्यावरून तरी शेतकरी कर्जमुक्त होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सोमवारी पारशिवनी, करंभाड, गोसेवाडी, कोंडासावळी, पालासावळी, सुवरधरा, बाबुळखेडा, बिठोली, सालई, टेंभरी, आवळेघाट, खंडाळा, डुमरी इत्यादी गावांतील सावकारांपासून त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा सहायक उपनिबंधक भोसले यांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला.
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतील तरतुदींपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सावकार विविध क्लृप्त्या वापरत आहेत. सावकार केवळ शेतकऱ्यांनाच लुबाडत नसून शासनालादेखील वाकुल्या दाखवत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१४ मधील हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्तता करण्याची घोषणा केली होती.
१० एप्रिल २०१५ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंतच्या सावकरी कर्ज व व्याजाला शासनाने माफ केले होते. या निर्णयांतर्गत परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाला माफी देण्यात आली होती.(प्रतिनिधी)

Web Title: There is no counting of lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.