नागपूर : वन्यजीवांच्या रक्षणावर सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करीत असले तरी वनविभागाचे नियोजन व्याघ्रकेंद्रीच असल्याचे दिसत आहे. केवळ वाघाभोवती सर्व यंत्रणा आणि नियोजन फिरत असल्याने अन्य प्राण्यांच्या जीविताकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेक घटनांवरून दिसत आहे. विनाकठड्याच्या विहिरींवर कठडे बांधण्याची योजना दहा वर्षे जुनी असली तरी अनेक ठिकाणी हे काम झालेच नाही. सातत्याने घटना घडत असल्या तरी मरणाऱ्या अन्य प्राण्यांची नोंद मात्र वनविभागाकडे नाही.
विनाकठड्यांच्या विहिरींमुळे राज्यात आजवर किती जनावरांचे मृत्यू झाले याची माहिती घेण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे संपर्क साधला असता, अशी आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. केवळ वाघांचीच मागील तीन वर्षांची अद्ययावत माहिती या कार्यालयाकडे आहे. त्यामुळे अन्य वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू वनविभागासाठी महत्त्वाचे नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेच्या माध्यमातून मागील पाच ते सहा वर्षापासून विहिरीवर कठडे बांधण्यासाठी पैसे देण्याची तरतूद आहे. मात्र शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचलेली नाही. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत कठडे बांधण्याची तरतूद आहे. त्यामधूनही फारसे निष्पन्न झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही योजनांमधून विहिरी बांधून दिल्या जातात. बरेचदा खर्च वाचविण्यासाठी कठडे बांधण्याचे टाळले जाते, असाही अनुभव आहे. अशा विहिरी दुर्दैवाने वन्यजीवांसाठी घातक ठरतात.
...
आरएफओला करता आले ते वनविभागाला का नाही?
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील वानाडोंगरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी २०१९ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून १० लाख रुपयांमधून वानाडोंगरी वनपरिक्षेत्रातील व जंगलालगतच्या सर्व खासगी, सरकारी ३९ विहिरींवर कठडे बांधून काढले. यासाठी त्यांनी शेतकऱ्यांकडून पैसाही घेतला नाही. कठडे बांधल्यापासून या घटना शून्यावर आल्या आहे. मात्र वनविभागाने वानाडोंगरीचा कित्ता गिरवला नाही. एवढेच नाही तर त्यांच्या कार्याची म्हणावी तशी दखलही वन विभागातील वरीष्ठांनी घेतली नाही. खरे तर राज्यभर अशाप्रकारे काम करायला हवे होते. एका आरएफओला करता आले, ते वनविभागाला का करता येऊ नये, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
...
१० वर्षांपूर्वी काढण्यात आले होते परिपत्रक
यासाठी योजना असल्या तरी वनविभागाच्या प्रयत्नांमध्ये जोम नाही. २०१९ ते चालू मे-२०२१ या काळात विहिरीत पडून ६ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. अन्य प्राण्यांची नोंदच नाही. प्रत्यक्षात अस्वल, रानडुक्कर, हरीण आदी प्राणी अनेकदा विहिरीत पडल्याच्या घटना आहेत. १० वर्षापूर्वी कठडे बांधण्यासाठी परिपत्रक निघाले होते. कामाचा अहवालही मागविला होता. मात्र हा विषय कुणी फारसा गांभीर्याने घेतला नाही.
...