विदर्भात आढळतात १८० प्रजातींची फुलपाखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:00 AM2020-09-16T07:00:00+5:302020-09-16T07:00:06+5:30

विदर्भात फुलपाखरांच्या तब्बल १८० प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यातील १२५ च्यावर प्रजातींची नागपूर जिल्ह्यात नोंद करण्यात आली आहे.

There are 180 species of butterflies in Vidarbha | विदर्भात आढळतात १८० प्रजातींची फुलपाखरे

विदर्भात आढळतात १८० प्रजातींची फुलपाखरे

Next
ठळक मुद्देचिमुकल्या शेतकरी मित्राला प्रदूषणाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
निशांत वानखेडे
नागपूर : अतिशय सुरेख रंग कलात्मकतेने पंखांवर सजवून एका फुलावरून दुसऱ्या फुलावर मकरंद सेवन करीत बागडणाऱ्या फुलपाखरांचे मुलांप्रमाणे प्रत्येकाला आकर्षण असतेच. त्याचे रुप खरोखर प्रसन्न करते. मनमोहक अशा या जीवासाठी विदर्भाचे वातावरण पोषक असून या भागात फुलपाखरांच्या तब्बल १८० प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यातील १२५ च्यावर प्रजातींची नागपूर जिल्ह्यात नोंद करण्यात आली आहे. पावसाळा ऋतू फुलपाखरांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यातही सप्टेंबर महिना हा फुलपाखरांसाठी पोषक आणि त्यांच्या प्रजननाच्या दृष्टिने अनुकूल असतो. ही बाब लक्षात घेत या वर्षीपासून देशात सप्टेंबर महिना बटरफ्लाय मंथ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षात फुलपाखरांची संख्या कमालीची घटली असून अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे या चिमुकल्या मोहक जीवाचे संवर्धन व्हावे व लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून हा महिना साजरा करण्याची कल्पना वन्यजीव प्रेमींनी अमलात आणली आहे. कारण हा जीव चिमुकला वाटत असला तरी निसर्गचक्रात त्याचे मोठे योगदान आहे. जगभरात तब्बल १७,८२४ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद आहे. त्यातील १५०५ प्रजाती आपल्या देशात आहेत. महाराष्ट्रात ही संख्या २७७ एवढी मोजली गेली आहे. या सर्वच प्रजातींची फुलपाखरे, पक्षी आणि कीटकांमुळे जंगलाचे अस्तित्व निर्माण झाले ही बाब अमान्य करता येणार नाही. निसर्गात परागीकरणाचे मोठे काम या जीवामुळे होते. या दृष्टिने शेतकऱ्यांचा मित्र म्हणून या इवल्याशा जीवाची गणना होते. कारण फुलझाडे ही फुलपाखरांचे खाद्यान्न आहे. त्यामुळे परागीकरणातून एक झाड दुसरीकडे निर्माण करण्याची मोठी क्षमता त्यांच्याजवळ असते. संत्रा, मोसंबी, केळी अशी फळझाडे तसेच तूर, मका, मूग, उडद आदी कडधान्य वृक्षांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लागवड करण्याचे काम फुलपाखरे करीत असतात. त्यामुळे त्यांचे अस्तित्व टिकून राहणे मानवासाठी व निसर्गासाठीही महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षात शेतीवर फवारणी, कीटनाशके, तणनाशके आदी रसायनांचा वापर वाढल्याने आणि प्रदूषणामुळे फुलपाखरांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी उपाय योजणे महत्त्वाचे झाले असून त्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

कीटनाशके, प्रदूषणाचा धोका, गेल्या काही वर्षात वाढते रसायनिक घटक व प्रदूषणाचा जवळपास सर्वच प्रजातींच्या फुलपाखरांना धोका निर्माण झाला आहे. शेतात फवारणी होणारे कीटनाशक, तणनाशक फुलपाखरांसाठी जीवघेणे आहेत. त्यामुळे काही प्रजाती नामशेषही झाल्या आहेत. याशिवाय जनावरांची चराई आणि वृक्षतोडीमुळेही फुलपाखरांचे अधिवास नष्ट होत आहेत. सोबत प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंगचे संकटही फुलपाखरांच्या जीवावर उठले आहे.
असे आहेत फुलपाखरांचे अधिवास विदर्भ फुलपाखरांच्या अधिवासाच्या दृष्टिने पोषक आहे. सर्वत्र असलेली वनक्षेत्र, अभयारण्य, गावातील शेतशिवारात त्यांचे अस्तित्व आहे. शहरातही छोटे गार्डन, उद्याने, फुलउद्याने आणि अगदी घरातील परसबागेतही त्यांचे वास्तव्य असते. देशी प्रजातीची फुलझाडे व फळझाडे ही त्यांच्या अधिवासासाठी पोषक आहेत.

फुलपाखरू मंथ साजरा करण्यासाठी वन्यजीव प्रेमींकडून फुलपाखरांवर आधारित पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा व फुलपाखरू निरीक्षणाचा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. फुलपाखरू संवर्धन हे जैवविविधता व निसर्गचक्र टिकविण्यासाठी आवश्यक तेवढेच सुदृढ मानवी अस्तित्वासाठीही महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. देशी फुलझाडे व फळझाडांची लागवड करावी. शहरात एकतरी फुलपाखरू उद्यान निर्मिती व्हावी. २०१३ ला तसा प्रस्ताव आला होता पण अस्तित्वात आला नाही.
यादव तरटे पाटील, सदस्य,

महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळ
शत्रू कीटकांसाठी पिकांवर रासायनिक फवारणी व प्रदूषणामुळे मित्रकीटक असलेल्या फुलपाखराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशावेळी निसर्गचक्र टिकविण्यासाठी फुलपाखरू संवर्धन अत्यावश्यक आहे.

 आशिष टिपले, फुलपाखरू अभ्यासक

 

Web Title: There are 180 species of butterflies in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.