सुमेध वाघमारे नागपूर: कपाळावरचे कुंकू पुसले गेल्याचे असीम दु:ख उरात असतानाही, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव किती थोर असू शकते, याचे ज्वलंत उदाहरण यवतमाळच्या वणी येथे पाहायला मिळाले. आपल्या आयुष्यातील 'सूरज' मावळला असला तरी, त्यांच्या अस्तित्वाचा प्रकाश दुसऱ्यांच्या घरात कायम राहावा, या उदात्त हेतूने पत्नी कोमल चावला यांनी पतीच्या ‘ब्रेन डेड’ नंतर अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे नागपुरातील चार मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळाले. वैद्यकीय वर्तुळात या माऊलीचे दातृत्व प्रेरणादायी ठरले.
सूरज कावडू चावला (४८) हे वणी येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास होते. ४ मार्च रोजी सायंकाळी सामान खरेदीसाठी दुचाकीने जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने वणीच्या शासकीय रुग्णालयात नेले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरच्या न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. येथील डॉक्टरांनी शथीर्चे प्रयत्न केले, परंतु मेंदूमध्ये झालेल्या तीव्र रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांच्या समितीमधील डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. पराग मून, डॉ. विवेक देशपांडे व डॉ. साहिल बंसल यांनी त्यांची तपासणी केल्यावर 'मेंदूमृत' (ब्रेन डेड) घोषित केले.
'शून्यातून' उभे केले दातृत्व
पती मेंदूमृत झाल्याचे ऐकताच कोमल यांच्यावर आभाळ फाटले. १८ वर्षांचा मुलगा जतीन आणि १४ वर्षांची मुलगी अंजली यांच्या डोक्यावरचे छत्र हरपले होते. पती आता परत येऊ शकत नाहीत, पण त्यांच्या अस्तित्वाने कोणाचे तरी घर उजळू शकते, हा विचार करून कोमल चावला यांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला. त्यांना दीर दीपक चावला आणि जावई अजय कुमार यांनी साथ दिली.
तीन तरुणांना मिळाले नवे जीवन
अवयवदानाची संमती येताच याची माहिती झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. मनीष श्रीगिरीवार आणि सचिव डॉ. शैलेश गहुकर यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात समन्वयक दिनेश मंडपे यांनी अवयवदानाची पुढील प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे तीन तरुणांना नवे जीवन मिळाले. ‘झेडटीसीसी’च्या माहितीनुसार यकृत न्यू इरा हॉस्पिटलमध्ये एका ३० वर्षीय तरुणाला, एक मूत्रपिंड याच हॉस्पिटलमधील एका ४१ वर्षीय पुरुषाला तर दुसरे मूत्रपिंड वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील २० वर्षीय तरुणीला दान करण्यात आले. नेत्रदान महात्मे आय बँक, नागपूर येथे दान करण्यात आले, ज्यामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळेल.
Web Summary : A Yavatmal woman's courageous decision to donate her brain-dead husband's organs gave new life to four patients in Nagpur. Her selfless act provided livers and kidneys, also donated eyes, offering hope and a future to recipients and inspiration to the medical community.
Web Summary : यवतमाल की एक महिला के साहसी फैसले ने अपने ब्रेन-डेड पति के अंगों का दान करके नागपुर में चार रोगियों को नया जीवन दिया। उनके निस्वार्थ कार्य से जिगर और गुर्दे मिले, आँखें भी दान की गईं, जिससे प्राप्तकर्ताओं को उम्मीद और भविष्य मिला और चिकित्सा समुदाय को प्रेरणा मिली।