नागपूर : नागपूर विभागाचा संपूर्ण प्रशासकीय कारभार ज्या परिसरातून चालतो त्या सिव्हील लाईन्समधील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील जागेत राजरोसपणे आॅनलाईन लॉटरीचे दुकान थाटण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे हे विशेष. विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ प्रशासकीय इमारत क्रमांक २ च्या बाजूला दोन खोल्यांचे गाळे काढण्यात आले आहे. या गाळ्यात भोजनालय आणि झेरॉक्स सेंटर उघडण्यात आले आहे. या झेरॉक्स सेंटरला लागूनच आॅनलाईन लॉटरीचे दुकान थाटण्यात आले आहे. दुकानावर लॉटरी सेंटरचा कुठलाही बोर्ड नाही. त्यामुळे ते अनधिकृत असण्याची शक्यता आहे. दुकानाच्या चारही बाजूचा परिसर पोत्यांनी झाकलेला आहे. आत दोन कॉम्प्युटर ठेवले आहेत. तेथे आॅनलाईन लॉटरीचा व्यवसाय सुरू आहे.सिव्हील लाईन्समधील या परिसरात प्रमुख शासकीय कार्यालये आहेत. त्यात विभागीय आयुक्त कार्यालय,जिल्हा परिषद, सिंचन विकास महामंडळ, विविध विभागांचे कार्यालय इतकेच नव्हे तर पोलीस कंट्रोल रूम आणि अॅण्टी करप्शन ब्युरोसह अनेक महत्त्वाचे विभाग या परिसरात आहेत. त्यामुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते.शासकीय अधिकारी आणि पोलिसांचा तर नेहमीच वावर असतो. या ठिकाणी सामान्य नागरिकांसह शासकीय कर्मचारी आणि पोलीसही मोठ्या प्रमाणावर लॉटरी खेळतात. मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. सर्वांनाच याची कल्पना आहे. परंतु कुणीही काही बोलायला तयार नाही. परिसरातील काही दुकानदारांनाही हा सर्व प्रकार अवैधपणे सुरू असल्याची माहिती आहे. त्यांनीही अनेकदा तक्रारी केल्या मात्र काहीही उपयोग झाला नाही. (प्रतिनिधी)
शासकीय कार्यालयांच्या परिसरातच थाटले ‘आॅनलाईन लॉटरीचे’ दुकान
By admin | Updated: June 13, 2014 01:32 IST