‘तोंडी’ बंद झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांवर गुणांचा तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:18 AM2019-01-14T11:18:10+5:302019-01-14T11:20:36+5:30

एरवी दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यासोबत संपूर्ण कुटुंबदेखील एका प्रकारे तणावातच असते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे.

Tension of marks on Class X students due to closure of 'oral' | ‘तोंडी’ बंद झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांवर गुणांचा तणाव

‘तोंडी’ बंद झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांवर गुणांचा तणाव

Next
ठळक मुद्देगुणांची कोंडीयंदा निकाल घटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी दहावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यासोबत संपूर्ण कुटुंबदेखील एका प्रकारे तणावातच असते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल केला आहे. चार विषयांची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देणे यंदापासून बंद करण्यात आले. शाळांकडून हे गुण सहजपणे देण्यात यायचे. परिणामी विद्यार्थ्यांसमोर या गुणांची भरपाई करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते यामुळे यंदा निकाल घटण्याची शक्यता आहे. गुणांच्या या बदलांमुळे विद्यार्थ्यांवरील तणाव वाढला असून घरोघरी याची प्रचिती येत आहे.
शिक्षण मंडळातर्फे अभ्यासक्रम पुनर्रचनेच्या आधारे विषय रचनेत व गुणप्रणालीत बदल करण्यात आले. दहावीत विद्यार्थ्यांना तीन भाषा विषय अनिवार्य आहेत. मागील वर्षीपर्यंत या विषयाचे मूल्यमापन हे लेखी व तोंडी परीक्षांच्या आधारावर व्हायचे. ८० गुण लेखी परीक्षेचे व २० गुण तोंडी परीक्षेचे रहायचे. यातील तोंडी परीक्षांचे गुण शाळांच्या हाती असायचे व त्यात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळायचे. मात्र यंदा तोंडी परीक्षा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. भाषा विषयात २० गुणांचा हा फरक भरून काढणे ही कठीण बाब मानली जाते.
दुसरीकडे सामाजिकशास्त्र विषयात १०० पैकी २० गुण प्रकल्पांवर असायचे. सहाजिकच विद्यार्थ्यांना यात चांगले गुण मिळत. मात्र यंदा सामाजिकशास्त्राचे मूल्यमापन पूर्णत: लेखी परीक्षेच्या आधारावर होणार आहे. भाषा व सामाजिकशास्त्रे हे विषय मिळून विद्यार्थ्यांच्या हक्काचे एकूण ८० गुण हातातून गेले आहेत. हे गुण विद्यार्थ्यांना लेखी परीक्षांच्या माध्यमातूनच मिळवावे लागणार आहे. सहाजिकच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल घटणार आहे. मागील वर्षी एखाद्या विद्यार्थ्याला ९५ टक्के असतील, तर त्याच गुणवत्तेच्या विद्यार्थ्याला यंदा ८३ ते ८५ टक्के मिळविताना नाकीनऊ येणार आहेत. हीच बाब सर्व विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे.
विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेच पाहिजे, अशी पालकांना अपेक्षा असते. अनेकदा यासाठी दबावदेखील टाकण्यात येतो. मात्र यंदाची गुणप्रणाली बदलल्याने ९० टक्क्यांच्या वर जाणे ही मोठी बाब राहणार आहे. मात्र बऱ्याच पालकांनी ही बाबच समजून घेतली नसल्याने विद्यार्थ्यांवर गुण मिळविण्याचा मोठा तणाव निर्माण झाला आहे.

भाषेचा निकाल घटणार
विद्यार्थ्यांना दहावीत भाषेचे तीन विषय अनिवार्य असतात. मागील वर्षीपर्यंत या एकूण ३०० गुणांच्या तीन विषयांसाठी विद्यार्थ्यांना ६० गुण तोंडी परीक्षेचे राखीव असायचे. यातील साधारणत: ४० ते ५० च्या वरच गुण विद्यार्थ्यांना मिळायचे. मात्र यंदा तोंडी परीक्षाच बंद झाल्याने हे गुण लेखी परीक्षेच्या माध्यमातून प्राप्त करावे लागणार आहे. त्यामुळे भाषेचा निकाल घटणार असल्याचेच दिसून येत आहे.

पालकांचे समुपदेशन आवश्यक
यासंदर्भात सोमलवार हायस्कूल, निकालस येथील मुख्याध्यापक विवेक जोशी यांना संपर्क केला असता त्यांनी यंदा निकालातील गुणवंतांचे गुण कमी होतील असे सांगितले. नवीन गुणप्रणालीमुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. पालकांना गुणप्रणालीची जाणीव असली तरी त्यांची विद्यार्थ्यांकडून ९० टक्क्यांहून अधिक गुणांची अपेक्षा कायम आहे. मात्र यामुळे निकालानंतर विद्यार्थी व पालकांना धक्का बसू शकतो. यासाठी विद्यार्थी व पालकांचे योग्य समुपदेशन होणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या शाळेत यादृष्टीने अगोदरच पुढाकार घेतला असून नवीन गुणप्रणाली नेमकी कशी आहे याची माहिती त्यांना देत आहोत. भाषांमधील ६० गुण पूर्णत: मिळणार नाही असे नाही. फक्त विद्यार्थ्यांना ते कमवायचे आहे. तोंडी परीक्षेत जास्त गुण मिळायचे, लेखीमध्ये ३५ किंवा ४० तर मिळतील. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, असे ते म्हणाले.

पालकांची भूमिका महत्त्वाची
जुन्या गुणप्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे खरे मूल्यमापन होत नव्हते. मात्र आता क्षमतांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. अगोदर गुणांची सूज होती, आता ती उतरणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता परीक्षेतून समोर येणार आहेत. भविष्याच्या दृष्टीने हे जास्त चांगले आहे. पालक व विद्यार्थ्यांनी गुण डोळ््यासमोर ठेवून विचार करू नये. विशेषत: पालकांनी अवास्तव अपेक्षा विद्यार्थ्यांवर लादू नये. घरी विद्यार्थ्यांवर गुणांचा तणाव आणण्याऐवजी त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल, यावर भर द्यायला हवा, असे मत समुपदेशक व ‘सायकोलॉजिस्ट’ प्रा.राजा आकाश यांनी व्यक्त केले.

Web Title: Tension of marks on Class X students due to closure of 'oral'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा