विदेशात नोकरीचे आमिष : अजनीत गुन्हा दाखल नागपूर : विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अजनीतील बहीण भावाला एका टोळीने १० लाखांचा गंडा घातला. एलिशबा व्हिवीयर डेमोराईज (वय २४) आणि तिचा भाऊ एडमंड अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. एलिशबा अजनीतील जोशीवाडी (कुकडे लेआऊट) मध्ये राहाते. २ डिसेंबर २०१४ ला दुपारी १ वाजता तिच्या मोबाईलवर एक फोन आला. यूएस मधील एका आॅईल आणि गॅस कंपनीत ‘अॅडमिनिस्ट्रेटीव्ह असिस्टंट मॅनेजरचे पद रिक्त आहे. या पदासाठी लठ्ठ पगार दिला जाणार असून, तुमची तयारी असेल तर आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकतो‘, असे पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले. एलिशबाने त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे नंतर तिला ७०६६७१३५९७ तसेच १९७२५८६७२४९ क्रमांकाच्या फोनवरून वेळोवेळी फोन येऊ लागले. ई-मेल आयडी दिल्यानंतर त्यावरही संपर्क सुरू झाला. कधी थॉमस वजदा, कधी रोलॅण्ड हाबतोर तर कधी अल्फ्रेड नावाचा व्यक्ती संपर्क करून वेगवेगळ्या सूचना करीत होता. एलिशबाच नव्हे तर तिचा भाऊ एडमण्ड यालाही मेकॅनिकल इंजिनियर म्हणून नोकरी देण्याची बतावणी आरोपींनी केली. त्यांना संबंधित कंपनीच्या नावे बनावट ई-मेल पाठविले. यूएस अॅम्बेसीतील थॉमस वजदा यांच्या नावाचा गैरवापर करून आरोपी हे सर्व बनवाबनवी करीत होते. त्यांनी बहीण भावाच्या एअर टिकीट, व्हीजा आणि वर्क परमिटकरीता पैसे लागतात म्हणून २ डिसेंबर २०१४ ते १८ मे २०१५ या कालावधीत एलिशबा आणि तिच्या भावाकडून १० लाख, १३ हजार, ७३० रुपये उकळले.(प्रतिनिधी)नुसतीच बनवाबनवीपैसे जमा केल्यानंतर एलिशबा आणि तिचा भाऊ जेव्हा जेव्हा नियुक्तीचा विषय काढायचे, त्या त्या वेळी आरोपी नवीन सबब सांगायचे. पुन्हा नव्याने रक्कम मागायचे. त्यामुळे या बहीण-भावाला संशय आला. त्यांनी चौकशी केली असता आरोपींनी त्यांना फसवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फोन किंवा ई-मेलला आरोपी प्रतिसाद देत नसल्यामुळे एलिशबाने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. त्यांचा शोध घेतला जात आहे.
दहा लाखांचा गंडा
By admin | Updated: May 25, 2015 02:56 IST