नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी १४ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. शाळेत येण्यापूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे निर्देश ९ डिसेंबरला दिले. त्यामुळे पुन्हा शिक्षकांची कोरोना चाचणीसाठी आरोग्य केंद्रामध्ये धावाधाव सुरू झाली आहे. नियमानुसार चाचणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत अवकाश घ्यावा लागतो. मात्र चाचण्या करून शिक्षक शाळेत व पालकांच्या घरोघरी संमतीपत्रासाठी फिरत आहे.
यापूर्वी शासनाने २६ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हाही कोरोना चाचणी करण्याचे शिक्षकांना सांगितले होते. त्यावेळी १३० च्या जवळपास शिक्षक पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १४ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वर्ग ९ ते१२ च्या ६५७ शाळा आहे. त्यापैकी ५६ शाळांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला होता. २६ नोव्हेंबरपूर्वी शिक्षकांनी पालकांकडून शाळेत पाठविण्यासंदर्भात संमतीपत्र गोळा केले. यात २५ टक्केच पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्यास संमती दिली होती. पुन्हा हाच प्रकार शिक्षकांना करावा लागतो आहे. वारंवार त्याच त्या गोष्टी कराव्या लागत असल्याने शिक्षकांनी वैताग व्यक्त केला आहे.
- कुठलेही आदेश स्पष्ट नाही
प्रशासनाचे शाळा सुरू करण्यासंदर्भात कुठलेही स्पष्ट आदेश अथवा नियोजन नाही. दुसरीकडे संस्थाचालकांकडून वेगळाच दबाव आहे. टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत सुटी द्यायला हवी, पण संस्थाचालक म्हणतात अवकाशासाठी शिक्षण विभागाचा आदेश नाही. त्यामुळे शिक्षक संस्थाचालकांच्या निर्देशानुसार चाचण्या करून शाळेत येत आहे. पालकांच्या घरी संमतीपत्रासाठी जात आहे. चाचणीत एखादा शिक्षक पॉझिटिव्ह आल्यास संक्रमण वाढण्याची शक्यता आहे.
- प्रशासनाने नेमकी भूमिका वठवावी
गेल्यावेळी केलेल्या चाचणीत १३० च्या जवळपास शिक्षक पॉझिटिव्ह आले. तेव्हा प्रशासनाने शाळा बंद केल्या. आता पुन्हा टेस्ट होत आहे. आणखी किती शिक्षक पॉझिटिव्ह येतील, याचा नेम नाही. परत शाळा बंद होण्याची स्थिती उद्भवेल. प्रशासनाने नेमकी भूमिका घ्यावी. वारंवार शिक्षकांना पळवून अनावश्यक त्रास देऊ नये.
मिलिंद वानखेडे, मुख्याध्यापक
- जिल्ह्यातील शाळांची स्थिती
एकूण शाळा - ६५७
एकूण कार्यरत शिक्षक - ५९४४
शिक्षकेतर कर्मचारी - ३२०३
एकूण विद्यार्थी - १३०४५४