लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाटा टेक्नॉलॉजी लिमीटेड यांच्यामार्फत रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र (सीआयआयटी) सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. टाटा टेक्नॉलॉजी लिमीटेडतर्फे जागतिक प्रमुख सुशीलकुमार व महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या सामंजस्य करार झाला.
रामगिरी येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्राची रामटेक येथे उभारणी करण्यासंदर्भात करार झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, टाटा टेक्नॉलॉजीचे शासकीय प्रकल्प जागतिक प्रमुख सुशीलकुमार, प्रकल्प समन्वयक प्रितम गंजेवार, शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी यावेळी उपस्थित होते.
रामटेक येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून सेंटर फॉर इन्व्हेंनशन, इनोवेशन, इन्क्युबेशन, आणि ट्रेनिंग सेंटर (सीआयआयटी) ची उभारणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक नवउपक्रमावर आधारित प्रशिक्षण देण्यासोबतच औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुविधा निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नवउपक्रम व संशोधन प्रशिक्षण सुविधा असलेल्या रामटेक येथील प्रकल्प टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे. या कौशल्यवर्धन केंद्रात इनोवेशन, डिझाईन ॲण्ड इन्क्युबेशन यासह नऊ प्रकाराच्या प्रशिक्षणाच्या सुविधा राहणार आहेत. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत यापूर्वी गडचिरोली, चंद्रपूर तसेच कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम, गोवा, उत्तरप्रदेश व तेलंगना येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
कौशल्यवर्धन केंद्र इमारत बांधकाम व प्रशिक्षण सुविधासह ११५ कोटी रूपयांचा प्रकल्प असून टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे ९८ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि मनुष्यबळ निर्माण होईल. याप्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना, उद्योग व्यवसायीकांना नवकल्पना आणि कौशल्यविकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधणे आणि उद्योजकात निर्माण होणार असल्याचे टाटा टेक्नॉलॉजीचे जागतिक प्रमुख सुशिलकुमार यांनी यावेळी सांगितले.