शेफ विष्णू मनोहर : ‘बेकरी बेकरी’ आणि दोन पुस्तकांचे प्रकाशननागपूर : स्वादिष्ट भोजन देऊन जगातल्या कुठल्याही माणसाला जिंकता येते; कारण हृदयाचा मार्ग पोटातून जातो, असे म्हटले जाते. आपल्या स्वादिष्ट व्यंजनांनी आणि उत्तमोत्तम रेसिपींनी केवळ गृहिणींच्याच नव्हे तर तमाम खाद्यप्रेमींच्या हृदयात स्थान मिळविणाऱ्या प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या तीन झणझणीत पुस्तकांचे प्रकाशन आज करण्यात आले. विष्णू की रसोईमध्ये असलेला व्यंजनांचा गंध...गावाच्या बाहेर आल्यासारखे वातावरण...शहरातील निवडक मान्यवरांची उपस्थिती आणि खमखमीत...रुचकर वक्तव्यांनी प्रकाशनाचा हा सोहळा स्वादिष्ट झाला. शेफ विष्णू मनोहर यांच्या रसोईमध्येच हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त श्याम वर्धने, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे पदाधिकारी रवींद्र दुरुगकर, अॅड. अनिल किलोर आणि लेखक शेफ विष्णू मनोहर प्रामुख्याने उपस्थित होते. वर्धने यांच्या हस्ते यावेळी ‘बेकरी बेकरी’ आणि दोन पुस्तकांचे थाटात प्रकाशन करण्यात आले. विष्णू मनोहर म्हणजे कलात्मकतेचा आणि सौंदर्याचा जाणकार माणूस म्हणून ख्यातकीर्त आहे. त्यामुळेच व्यंजनांच्या पुस्तकांचे प्रकाशन कोरडेपणाने होणार नव्हतेच. या सोहळ्यावर विष्णूजींच्या कल्पकतेची मोहोर होती. त्यात श्याम वर्धने यांनी औचित्यपूर्ण शुभेच्छांनी उपस्थितांची दाद घेतली. वर्धने म्हणाले, विष्णू जगाचा निर्माता आहे, पण आपल्यासोबत असणारा विष्णू केवळ निर्माताच नव्हे तर मनोहरही आहे. या विष्णूची निर्मिती आल्हाददायक आणि आनंद देणारी आहे. रवींद्र दुरुगकर म्हणाले, हा सारा सोहळाच वेगळ्या अर्थाने स्वादिष्टतेने भरला आहे. पुणे, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर येथे विष्णुजी की रसोई आहे. यानिमित्ताने भोजनातून वऱ्हाडी संस्कृती लोकांना कळते आहे. भविष्यात प्रत्येक शहरात त्यांची रसोई असावी. त्यांनी पंचतारांकित हॉटेल उघडावे; पण त्याचे नाव मात्र विष्णू की रसोईच ठेवावे, असे सांगितले. यानंतर त्यांनी विष्णू मनोहर यांची छोटेखानी प्रकट मुलाखत घेतली. कार्यक्रमाला शुभेच्छा देणारे पत्र गिरीश गांधी यांनी पाठविले होते. याप्रसंगी काही प्रश्नांना विष्णू मनोहर यांनी खुसखुशीत उत्तरे दिली.वडिलांना मी चित्रकार झालेला हवा होतो. पण मी ते दोन्हीही झालो नाही आणि अपघाताने या क्षेत्रात आलो. त्यानंतर आज माझे २८ वे व्यंजनांवरचे पुस्तक प्रसिद्ध होते आहे, याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. अनिल किलोर यांनी तर आभार विष्णू मनोहर यांनी मानले. (प्रतिनिधी)
झणझणीत वक्तव्यांचा स्वादिष्ट सोहळा
By admin | Updated: September 19, 2014 00:57 IST