तान्हा पोळ्यात उत्साहात रंगले चिमुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:27 PM2019-08-31T23:27:41+5:302019-08-31T23:37:20+5:30

आकर्षक सजावट, भारतमाता, शेतकरी, महादेव, शिवाजी महाराज अशा वेशभूषा करून नटलेले बालगोपाल, आकर्षक डौलदार नंदीसोबत लावलेले सामाजिक संदेश, अशा उत्साहाच्या वातावरणात शहरात तान्हा पोळा साजरा करण्यात आला.

In Tanha Pola enthusiasm children become colorful | तान्हा पोळ्यात उत्साहात रंगले चिमुकले

तान्हा पोळ्यात उत्साहात रंगले चिमुकले

googlenewsNext
ठळक मुद्देचिमुकल्यांच्या वेशभूषा आणि आकर्षक नंदी सजावट ठरले आकर्षणदेशाचे संरक्षण, पर्यावरण, शेतकऱ्यांचे दोहन यावर दिले सामाजिक संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डीजेच्या तालावर महादेवाची गाणी, आंब्याची पाने आणि फुग्यांचे तोरण, आपला नंदी सर्वात छान दिसावा म्हणून केलेली आकर्षक सजावट, भारतमाता, शेतकरी, महादेव, शिवाजी महाराज अशा वेशभूषा करून नटलेले बालगोपाल, आकर्षक डौलदार नंदीसोबत लावलेले सामाजिक संदेश, अशा उत्साहाच्या वातावरणात शहरात तान्हा पोळा साजरा करण्यात आला. 

ढोलताशांच्या गजरात खाऊची धम्माल, आयोजकांकडून करण्यात आलेली बक्षिसांची लयलूट, बोजाऱ्याच्या रूपात घराघरातून मिळणारे चॉकलेट तर कुठे पैसे मिळाल्यानंतर ओसंडून वाहणारा चेहऱ्यावरचा आनंद शहरातील गल्लोगल्लीत अनुभवायला आला. शहरात शनिवारी तीनशेहून अधिक ठिकाणी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

नवीन सुभेदारमधील तान्हा पोळ्यात बच्चे कंपनीची धूम
स्व. अमर शहीद विजय कापसे स्मृतिप्रीत्यर्थ नवीन सुभेदार येथील नागमंदिराजवळ आयोजित तान्हा पोळ्यात बच्चे कंपनीने धूम केली. मागील २५ वर्षांपासून नवीन सुभेदार ले-आऊटमध्ये तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विविध वेशभूषा केलेल्या ५ हजार बालकांनी आपले नंदीबैल घेऊन तान्हा पोळ्यात हजेरी लावली. बालकांनी केलेल्या आकर्षक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात शेतकरी, श्रीकृष्ण, राधा, विठ्ठल, शंकरजी, श्रीगणेश, तिरुपती बालाजी आदींची वेशभूषा बालकांनी केली होती. तर सामाजिक संदेश देणारे नंदी घेऊन बालक तान्हा पोळ्यात सहभागी झाले होते. यात सेव्ह ट्री, बेटी बचाओ, बेटी पढाओ, पर्यावरण रक्षण, स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष आभा चतुर्वेदी, माजी नगरसेवक दीपक कापसे, सक्करदºयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित सिद, हुडकेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, प्रकाश इटनकर, मधुसूदन मुडे, बबन यादव, डॉ. डी. बी. चौधरी, किशोर करांगळे, आदर्श शिक्षक वासुदेव कापसे, ए. बी. जिचकार आदी मान्यवर उपस्थित होते. आकर्षक वेशभूषा केलेल्या चार बालकांना सायकल आणि शिल्ड आणि सहा बालकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. पहिल्या चार नंदीला सायकल आणि शिल्ड तसेच सहा नंदीला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. मान्यवरांनी बैलाची पूजा करून विजेत्या नंदीला पुरस्काराचे वितरण केले. तान्हा पोळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकर्षक वेशभूषा करून बालकांनी वेधले लक्ष
अयोध्यानगर, कृष्णमंदिरासमोरील सुर्वे ले-आऊट येथे पुरुषोत्तम ऊर्फ बापू मते व्यायामशाळेच्या वतीने तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. तान्हा पोळ्यात हजारावर बालकांनी आकर्षक वेशभूषा करून हजेरी लावली. मागील २८ वर्षांपासून येथे पोळा भरविण्यात येतो. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, गिरीश पांडव, प्रमोद मानमोडे, माजी आमदार मोहन मते, विशाल मुत्तेमवार, नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका रिता मुळे, स्नेहल बिहारे, विजय अडसड उपस्थित होते. तान्हा पोळ्यात बालकांनी शेतकरी, श्रीकृष्ण, राधा, राम, श्री गणेश, विठ्ठल, संतांची वेशभूषा करून हजेरी लावली. तर बालकांनी हातात पर्यावरण बचाओ, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्वच्छता आदी संदेश देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या तीन नंदीला रोख पुरस्कार तसेच लकी ड्रॉद्वारे चार सायकल भेट देण्यात आल्या. याशिवाय सजावटीसाठी पुरस्कार देण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बालकांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. तान्हा पोळ्याचे आयोजन महेश बांते, राजेश शेळके, गणेश धोटे, सचिन मते, नूपुर मते यांनी केले. तान्हा पोळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
श्री टेकडी रोड हनुमान मंदिर
श्री टेकडी रोड हनुमान मंदिर समिती गवळीपुरा सीताबर्डी येथे तान्हा पोळा आयोजित करण्यात आला होता. जवळपास ८०० बालके पोळ्यात सहभागी झाली होती. समितीतर्फे नंदीबैलाची पूजा करण्यात आली. बालकांना खाऊ वाटण्यात आला. ढोलताशांचा गजर करण्यात आला. याप्रसंगी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सुंदर नंदी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विजयी ठरलेल्या बालकांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
बालजगत
लक्ष्मीनगरातील बालजगतमध्ये तान्हा पोळा थाटात साजरा झाला. लहान बालके शेतकरी राजा बनले होते. बालिका नऊवारी नेसून दिमाखात मिरवत होत्या. प्रत्येकाने आपले नंदीबैल सजवून आणले होते. बालजगतच्या आयोजकांनी बैलांची पूजा करून प्रसाद वाटला. यावेळी जगदीश सुकळीकर, माधवी जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
राजाबाक्षा
राजाबाक्षा नागरिक सेवा समिती व जय दुर्गा उत्सव मंडळ यांच्यावतीने तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीच्या ज्येष्ठ मंडळींनी शंकराची गाणी गायली. आलेल्या चिमुकल्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. नंदीची पूजा करून चॉकलेट दिले. यावेळी एका चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांंने यावर्षी पडलेल्या दुष्काळाचे चित्र उभे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. उत्सवाच्या आयोजनासाठी सुनील काडगाये, विष्णू भुते, दिनकर वानखेडे, राजू कुंभलकर, मुकेश खराबे, पंचांग चकोले, अविनाश ईश्वरकर, दिलीप बांते, शंकर बजवे, अरविंद बांते व धनराज इश्वरकर आदींनी सहकार्य केले.
चिंचभुवन
चिंचभुवन येथे तान्हा पोळाचे आयोजन करण्यात आले. तान्हा पोळ्यात ५०० नंदी आले होते. पोळ्याचे आयोजन प्रणित मोहोड, पवन पन्नासे यांनी केले. बालक विविध प्रकारची वेशभूषा करून नंदीसह उत्साहात सहभागी झाले होते. विजेत्या नंदीला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमचे चिंचभुवनचे ज्येष्ठ नागरिक गजानन भोयर, राजू नागापूरकर, संजय घाटे, अभिमन्यू मोहोड, छत्रपती बोबडे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला अमित नाहाले, अनिकेत सातपुते, साहिल सातपुते, स्वप्निल बोबडे, रोशन व्हारडकर, आशिष बोबडे उपस्थित होते.
प्रतापनगर
प्रतापनगर चौक येथे भव्य तान्हा पोळा आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तान्हा पोळ्यात ३०० हून अधिक बालगोपाल सहभागी झाले होते. चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदा जिचकार, गोपाल बोहरे, लीलाधर डाफ, तीर्थराज पन्नासे, अशोक भोयर, विनय राऊत, प्राजक्त चौधरी, विनोद पांडे, महेश उपदेव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राकेश पन्नासे आणि सहकाऱ्यांनी केले. विजेत्या नंदीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तान्हा पोळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: In Tanha Pola enthusiasm children become colorful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.