शिक्षक व कर्मचारी संघटनांची मागणी : आज जिल्हा परिषदेसमोर नारे-निदर्शनेनागपूर : भंडारा येथील खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक पत्नीच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या कार्यालयात गेले असता, निंबाळकर यांनी शिक्षकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून कार्यालयातून हाकलून लावले. सीईओ निंबाळकर यांच्या कृतीचा शिक्षक संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी निषेध केला आहे. सीईओंवर कारवाई करण्याची मागणी संघटनांकडून होत आहे. कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने सीईओंवर कारवाई करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. सीईओंनी दिलेली शिवीगाळ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणात भारतीय प्रशासन सेवेतील उच्च अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संघटनेचे नागपूर जिल्ह्यातील शिक्षक, ग्रामसेवक, लिपिक व तांत्रिक कर्मचारी ५ मे रोजी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी नरेंद्र धनविजय, परसराम गोंडाणे, अशोक राऊत, नारायण मालखेडे, धनराज राहुळकर, प्रबोध धोंडगे, जगन्नाथ सोरते, चंदन चावरिया आदी उपस्थित होते. या घटनेबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. सीईओंविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ ५ मे रोजी शिक्षक परिषदेचे विभाग अध्यक्ष डॉ. उल्हास फडके व सहकार्यवाह योगेश बन यांच्या नेतृत्वात भंडारा जि.प.समोर नारे- निदेर्शने करण्यात येणार आहे. तसेच ११ मेपासून विभागीय आयुक्त कार्यालयापुढे आमरण उपोषणाचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे. (प्रतिनिधी)
भंडारा सीईओविरुद्ध कारवाई करा
By admin | Updated: May 5, 2016 03:13 IST