नागपुरात संशयखोर पतीने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:07 PM2020-05-12T21:07:17+5:302020-05-12T21:10:02+5:30

संशयाने पछाडलेल्या आरोपीने त्याच्या पत्नीची गळा कापून हत्या केली. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी नगरात मंगळवारी पहाटे ही थरारक घटना घडली.

Suspicious husband kills wife in Nagpur | नागपुरात संशयखोर पतीने केली पत्नीची हत्या

नागपुरात संशयखोर पतीने केली पत्नीची हत्या

Next
ठळक मुद्दे धारदार शस्त्राने कापला गळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संशयाने पछाडलेल्या आरोपीने त्याच्या पत्नीची गळा कापून हत्या केली. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी नगरात मंगळवारी पहाटे ही थरारक घटना घडली. विलास मनोहर भुजाडे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून श्रुती विलास भुजाडे (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे.
आरोपी विलास भुजाडे आणि श्रुतीचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना साडेचार वर्षांची माही नामक मुलगी आहे. काही दिवसांपासून विलासला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला होता. संधी मिळताच श्रुती मोबाईलवर तासन्तास कुणाशी तरी गप्पा मारत होती. त्यामुळे तिचे बाहेर अवैध संबंध असावेत, असे विलासला वाटत होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण होत होते.
सोमवारी तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता. त्यानंतर श्रुतीसुद्धा घराबाहेर गेल्याचे त्याला कळले. रात्री घरी परत आल्यानंतर या दोघांमध्ये त्यावरून वाद सुरू झाला. वारंवार सांगूनही तू ऐकत का नाही, कुणाशी बोलते, आज तू बाहेर कुणाकडे गेली होती, असे प्रश्न करून विलासने श्रुतीला धारेवर धरले. डॉक्टरकडे गेली होती, असे सांगून तिने वाद संपवण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयाचे भूत मानगुटीवर बसल्यामुळे विलास मानायला तयार नव्हता. त्यामुळे मध्यरात्र झाली तरी त्यांच्यातील वाद सुरूच होता. पहाटे ३.३० च्या सुमारास अचानक श्रुतीची किंकाळी ऐकू आली आणि खालच्या तसेच वरच्या माळ्यावर राहणारे त्याचे भाऊ, वहिनी आणि आई-वडील धावले. श्रुतीच्या गळ्यावर विलासने धारदार शस्त्राने घाव घातले होते. ती रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. हे थरारक दृश्य पाहून नातेवाईकांनी नंदनवन पोलिसांना माहिती दिली. नंदनवन पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी विलासला ताब्यात घेतले.

Web Title: Suspicious husband kills wife in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.