नागपूर : नागपूर जिल्ह्यासह विदर्भात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. रुग्णवाढीला विषाणूचा नवा प्रकार कारणीभूत (न्यू स्ट्रेन) असल्याची शंका वैद्यकीय क्षेत्रातील विशेषज्ञ व्यक्त करीत आहे. परंतु शासनाकडून अद्यापही या विषयी स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे, नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत केंद्रीय आरोग्य पथकाच्या सूचनेवरून ३७ गंभीर रुग्णांचे नमुने दिल्लीच्या ‘एनसीडीसी’कडे पाठविले होते. यात काही ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या रुग्णांचेही नमुने होते. परंतु आता याला महिना होत असताना अद्यापही याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वाढलेल्या कोरोना विषाणूच्या स्ट्रेननंतर नुकताच एक नवा स्ट्रेन फ्रान्समध्ये आढळून आला आहे. नाकातून घेण्यात येणाऱ्या स्वॅब चाचणीतून हा विषाणू आढळून येत नसल्याचे समोर आले आहे. ब्रिटन प्रातांत आठ जणांमध्ये या विषाणूचे निदानही झाले आहे. परंतु आपल्याकडे नव्या स्ट्रेनविषयी उघडपणे फारसे कोणी बोलत नसल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. आरोग्य विभागाकडून या वाढीची कारणे शोधण्याचा प्रयत्न म्हणून येथील नमुने पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे पाठविले. नंतर आरोग्य विभागाने अमरावती व यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळून आला नसल्याचे स्पष्ट केले होते. याचदरम्यान नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य पथकाने नागपूरला भेट देत कोरोनाचा आढावा घेतला. त्यावेळी गंभीर रुग्णांचे नमुने दिल्लीच्या ‘एनसीडीसी’कडे पाठविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मेयोच्या प्रयोगशाळेने ३७ नमुने पाठविले. परंतु अद्यापही अहवालांची प्रतीक्षा कायम आहे.
-८० नमुन्यांचा अहवाल मिळालाच नाही
अधिक वेगाने पसरणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मेयोच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेने (व्हीआरडीएल) सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यातील प्रत्येकी २० रुग्णांचे नमुने गोळा करून जवळपास ८० नमुने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही) जनुकीय संरचनेचा अभ्यास करण्यासाठी पाठविले होते. परंतु अद्यापही याचा अहवाल मिळाला नाही.
-अहवाल ‘आयसीएमआर’ला कळवू
मेयोच्या प्रयोगशाळेने पाठविलेल्या ३७ नमुन्यांच्या अहवालाचा पाठपुरावा प्रयोगशाळेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतला असता तेथील अधिकाऱ्यांनी याचा अहवाल तुम्हाला नाही थेट ‘आयसीएमआर’ला कळवू, असे उत्तर दिले होते. नमुने पाठवून आता महिनाभराचा कालावधी होत असताना अद्यापही अहवाल प्राप्त झालेला नाही. या संदर्भात आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संज़य जयस्वाल यांना विचारले असता दिल्लीच्या ‘एनसीडीसी’ला याबाबत विचारणा करू, असे उत्तर दिले.