नागपूर : चेनस्रॅचिंग आणि भररस्त्यावर होणारे गुन्हे रोखण्यासाठी प्रतापनगर पोलिसांनी नवा प्रयोग सुरू केला आहे. त्यांनी चौकाचौकातील छोटे दुकानदार तसेच टपरीवाल्यांना पोलीस मित्र बनवून त्यांच्यामाध्यमातून गुन्हेगारीला आळा घालण्याची कल्पना मांडली आहे. या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आज प्रतापनगरातील तीन ठिकाणी पोलिसांनी नागरिकांच्या ‘स्टँडिंग मिटींग‘ घेतल्या.चेनस्रॅचिंग, चोऱ्या आणि घरफोडीच्या बाबतीत प्रतापनगर पोलीस ठाण्याचा नंबर उपराजधानीत अव्वल स्थानी आहे. गेल्या दीड वर्षात सर्वाधिक चेनस्रॅचिंग प्रतापनगरात घडले. त्यामुळे या भागातील नागरिक, विशेषत: महिला-मुली कमालीच्या दहशतीत आहेत. प्रतापनगर ठाण्यातील काही पोलीस अधिकारी गुन्हेगारांशी मैत्री करून असल्यामुळे येथील गुन्हेगारी सारखी वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर, ए.जी.त्रिपाठी यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्याचा कारभार नुकताच हाती घेतला. वाढती गुन्हेगारी आणि चेनस्रॅचिंगला आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्यातील संख्याबळ पुरेसे नाही, हे ध्यानात घेऊन त्यांनी एक योजना आखली. विविध चौकात, रस्त्यावर छोटे दुकानदार, सलूनवाले, चहा-पान टपरीवाले, नाश्तावाले, भाजीपाला, फळविक्रेते, भेळपुरी, पाणीपुरी विक्रेते, आॅटोचालक, रिक्षाचालक आणि पंक्चरवाले हे सकाळपासून उशिरारात्रीपर्यंत कार्यरत असतात. अनेकदा त्यांच्यासमोरच छोटेमोठे अनेक गुन्हे घडतात. मात्र, आपण मध्ये पडलो तर पोलिसांचे लचांड मागे लागेल, याची भीती असल्याने ते गुन्हेगारांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी गुन्हेगार बिनबोभाट पळून जातात. उपरोक्त सर्वांना सोबत घेतल्यास गुन्हेगारांना जेरबंद करण्यात, गुन्हेगारीला आळा घालण्यात यश मिळेल, हे ध्यानात घेऊन त्यांनी ‘या‘ सर्वांना पोलीस मित्र बनविण्याची कल्पना मांडली. त्याची सुरुवात आजपासून झाली. ठाणेदार त्रिपाठी यांनी आज सायंकाळी त्रिमूर्तीनगर चौक आणि संभाजीनगर चौकात टपरीवाल्यांच्या उभ्याउभ्याच मिटींग घेतल्या. त्यांना विश्वासात घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कोणतीही अडचण किंवा त्रास होणार नाही, याचा विश्वासही दिला. पोलीस मित्र बनणार,या कल्पनेने हुरळून अनेकांनी पोलिसांची ही कल्पना उचलून धरली आहे.(प्रतिनिधी)
चेनस्नॅचरवर टपरीवाल्यांची पाळत
By admin | Updated: June 21, 2014 02:42 IST