नागपूर : प्राप्त माहितीनुसार मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३५४ (५) अन्वये गुरुवारी सकाळी ६.३० वाजता मरेपर्यंत फासावर लटकवण्यात आले. त्याला ४.४५ वाजताच्या सुमारास कोठडीबाहेर काढून फाशी यार्डात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ओळखीची केली खात्री ओळख चुकून किंवा कुणाच्या तरी घातपाताने याकूब व्यतिरिक्त इतर फासावर लटकू नये, याबाबत विशेष खबरदारी म्हणून कारागृह अधीक्षक योगेश देसाई आणि उपअधीक्षक कुर्लेकर यांनी याकूबच्या कोठडीत जाऊन उपलब्ध चेहरेपट्टीवरून तो याकूब मेमनच आहे, याबाबत खात्री करून घेतली. त्याला त्याच्या भाषेत डेथ वॉरंट वाचून दाखवण्यात आला. इच्छा आणि अन्य संदर्भातील विविध दस्तऐवजावर खुद्द अधीक्षक देसाई यांनी आपल्या समक्ष त्याच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर देसाई फाशी यार्डाकडे निघून गेले. पाठमोरे हात बांधून दंडाबेडीही फासावर जाताना याकूबने कोणताही हिंसक प्रतिकार करू नये म्हणून उपअधीक्षकाच्या उपस्थितीत त्याचे दोन्ही हात पाठमोरे जखडून बांधण्यात आल होते. पायात दंडाबेडी घालण्यात आली होती. उपअधीक्षक आणि पाच वॉर्डर यांनी याकूबला फाशी स्तंभाकडे नेले. वॉर्डरांपैकी दोघे त्याच्या पुढे, दोघे मागे होते. अन्य एक जण त्याच्या दोन्ही भुजा जखडून चालत होता. फाशी यार्डाच्या ठिकाणी खुद्द अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. ४० मिनिटात प्रक्रिया पूर्ण फाशी देण्यापूर्वी याही ठिकाणी त्याला त्याच्या भाषेत डेथ वॉरंट वाचून दाखविण्यात आला, त्यानंतर त्याला फाशी देणाऱ्या खास पोलीस जवानांच्या ताब्यात देण्यात आले. वॉर्डरने उचलून त्याला फाशीच्या दोराच्या खाली फाशी स्तंभाच्या फळीवर उभे केले. त्याचे दोन्ही पाय जखडून बांधून त्याचे डोके आणि संपूर्ण चेहरा काळ्या रंगाच्या कॅपने झाकण्यात आला. स्तंभाला अडकलेला गळफास त्याच्या गळ्यात टाकण्यात आला. तो गळ्यात घट्ट बसवण्यात आला. अधीक्षक देसाई यांनी इशारा करतचा कळ दाबून यांत्रिकदृष्टा बसवण्यात आलेली फळी सरकली आणि याकूबचे शरीर फळीखालच्या काहीशा खोल खड्ड्याच्या ठिकाणी लोंबकळले. अर्धा तासपर्यंत त्याचे शरीर लोंबकळत ठेवण्यात आले. अवघ्या ४० मिनिटात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून याकूबला मृत घोषित केले. कारागृह अधीक्षकाने शिक्षा पूर्ण केली, असा शेरा लिहून आणि स्वाक्षरी करून डेथ वॉरंट परत केला. (प्रतिनिधी) ‘त्याने’च टाकला याकूबच्या गळ्यात फास दहशतवादी अजमल कसाबला फाशी देणारा शिपाई राम शिंदे यांनीच याकूबच्या गळ्यात फास टाकला. तर तुरुंग अधीक्षक योगेश देसाई यांनी खटका ओढला. अधीक्षक देसाई आणि शिपाई शिंदे हे कसाबला फाशी देणाऱ्या टीममध्ये सहभागी होते. फासाच्या वेदीवर नेल्यानंतर शिंदे यांनी याकूबचे हात बांधले. चेहरा झाकला आणि गळ्यास फास टाकला. त्यानंतर खटका ओढताच याकूब फासावर लटकला.
अशी दिली फाशी !
By admin | Updated: July 31, 2015 02:58 IST