लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण काळामध्ये दूर शिक्षणाचा एक यशस्वी प्रयोग म्हणून ‘शाळा बाहेरची शाळा’ या रेडिओ कार्यक्रमाने आपली ओळख बनविली आहे. आज, गुरुवारी सकाळी १०.३० वाजता शंभराव्या भागाचे प्रक्षेपण होत आहे. विभागीय आयुक्त डाॅ. संजीव कुमार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, १०० व्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये किमान मूलभूत क्षमता, वाचन आणि संख्येवरील क्रिया यामध्ये मुलांचा पाया मजबूत व्हावा या हेतूने मागील दोन वर्षांपासून लर्निंग इम्प्रोव्हमेंट प्रोग्रॅम हा कार्यक्रम प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन एकत्रितरीत्या राबवित आहेत. कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे चालू राहावे, या हेतूने रेडिओ आधारित कार्यक्रम ‘शाळा बाहेरची शाळा’ हा कार्यक्रम १ मे २०२०पासून नागपूर आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या रेडिओ आधारित अध्ययन कार्यक्रमाला गावातील गावकरी, सरपंच, विद्यार्थी व त्यांचे पालक, अंगणवाडीतील ताई, शिक्षक, मुख्याध्यापक यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी राज्य विज्ञान शिक्षक संस्थेचे संचालक रवींद्र रमतकर व त्यांचे पथक सांभाळत आहे.