लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसांपासून रुसलेला मान्सून विदर्भात पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारी रात्री ८.३० वाजेपासून धो धो बरसलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी-नाल्यांसह नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. हवामान खात्याच्याआकडेवारीनुसार शनिवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत शहरात एकूण १४१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे तसेच जिल्ह्यात सरासरी ९९.९९ मिमी पाऊस झाला आहे. या पावसाने शहरातील अंबाझरी तलावासोबतच गोरेवाडासुद्धा तुडुंब भरला आहे.शनिवारी सकाळी ५.४५ वाजता अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला तसेच गोरेवाडा तलावातील पाणीसाठा ३१५.४० मीटरपर्यंत वाढला आहे शिवाय कन्हान नदीचा जलस्तरसुद्धा वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी नीरी व व्हीएनआयटीच्या जलतज्ज्ञांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे निरीक्षण केले होते. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. परंतु शुक्रवारी मुसळधार पावसामुळे ते संकट दूर झाले आहे. तब्बल चार ते पाच तास कोसळलेल्या या पावसाने जिल्ह्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत तसेच शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले. मात्र पाऊस थांबताच परिस्थिती सामान्य झाली. यातच लॉ कॉलेज चौकातील एक झाड रस्त्यावर कोसळले. तसेच कळमेश्वर तालुक्यातील ब्राम्हणी व मोहपा परिसरातील काही शेतात नाल्याचे पाणी शिरल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त कुठेही कोणतीही हानी झाली नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १५१.२० मिमी पावसाची नोंद झाली असून, कामठी तालुक्यात १४२.६० मिमी, नागपूर (शहरी व ग्रामीण) भागात१४१. ९० मिमी, मौदा तालुक्यात १३७.०० मिमी, पारशिवनी तालुक्यात ११७.३० मिमी इतका पाऊस झाला आहे.अधिक पावसाचे तीन दिवसआतापर्यंत तीन दिवस सर्वाधिक पाऊस झाला आहे. यात २२ जून रोजी विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असले तरी २७ जून रोजी ११३ मिमी पाऊस झाला. संपूर्ण जून महिन्यात एकूण २१६.६ मिमी पाऊस पडला. १८ जुलै रोजी १३५ मिमी पाऊस झाला. संपूर्ण महिन्यात एकूण ३२२ मिमी पाऊस झाला. यानंतर शुक्रवारी म्हणजे १९ आॅगस्ट रोजी १४१.९ मिमी पाऊस झाला.पुढील दोन दिवस मुसळधारहवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य भारतात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. यामुळे विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.मागील २४ तासात नागपूरसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाला आहे. यात नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सर्वाधिक १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये १४१.९ मिमी, मौदा व कामठी येथे १४० मिमी, पारशिवनी व नागभीडमध्ये १२० मिमी, सावनेर, भिवापूर व मोहाडी येथे १०० मिमी, पवनी, रामटेक व कळमेश्वरमध्ये ९० मिमी, नरखेडमध्ये ८० मिमी, ब्रम्हपुरी, भामरागड, भंडारा व तुमसरमध्ये ७० मिमी पाऊस झाला आहे.