लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)तर्फे यावर्षी ओबीसी प्रवर्गातील ७ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जेईई/नीट व एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्याचा संच वितरित करून देण्यात येत आहे. या ‘पुस्तक संच वाटप योजने’चा लाभ घेण्यासाठी राज्याभरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. यामुळे जेईई,नीट व एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मार्ग अधिक सुकर होणार, असा विश्वास ‘महाज्योती’चे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
‘महाज्योती’ द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदिंचे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावर्षी जेईई,नीट व एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहे. त्यानुसार ‘पुस्तक संच वाटप योजने’अंतर्गत राज्यभरातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा संच दिले जात आहे. या नोंदणीत जळगाव विभागातून सर्वाधिक विद्यार्थी सहभागी झाले असून, त्याचबरोबर अमरावती, धुळे, बुलढाणा, अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
"जेईई/नीट व एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या ‘पुस्तक संच वाटप योजने’ला विद्यार्थ्यांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे ‘महाज्योती’च्या उल्लेखनीय कार्याची पावती आहे."- प्रशांत वावगे, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती