लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ही पारदर्शक व एकसंध प्रणाली सुरू केली असली तरी काही संस्थाचालक आणि मध्यस्थांकडून याच व्यवस्थेचा गैरवापर करून बोगस भरती घडवून आणल्याचे गंभीर प्रकार पुढे येत आहेत. यामुळे शिक्षक भरतीचे स्वप्न पाहत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यातील सर्व बोगस शिक्षकांवर कारवाई करून सर्व जागा पवित्र पोर्टलवर टाकाव्यात व नवीन भरती करावी अन्यथा आंदोलन उभारू अशा मागणीचे निवेदन विद्यार्थी परिषदेचे विनोद नौकरीया यांनी तहसीलदारामार्फत शिक्षणाधिकारी यांना केले आहे.
नागपुरात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला. यात अनेक अधिकाऱ्यांना अटक झाली. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार माध्यमातून वाचायला मिळतो आहे; मात्र यात अजूनही शिक्षक, संचालक व मध्यस्थ यांच्यावर ठोस कारवाई झाली नाही. या प्रकारात अडकलेल्या सर्वावर त्वरित कारवाई न झाल्यास ११ ऑगस्टपासून उपोषणाला बसण्याचा इशारा तरुण वर्गाने निवेदन देत दिला आहे.
"काही संस्थांनी शिक्षक भरती करताना पवित्र पोर्टलला बगल देत नियमबाह्य पद्धतीने व बॅक डेटेड शिक्षक नियुक्ती केल्याचे पुरावे उघड झाले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेला काळीमा फासणारी असून, पात्र उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवणारी आहे."- विनोद नौकरीया, विद्यार्थी परिषद