गुमगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास कोविड नियमांचे पालन करत परवानगी दिली आहे. परंतु ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असणारी एसटी अद्यापही सुरू झाली नसल्याने गुमगाव परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एसटी पूर्ववत सुरू करण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली आहे. गुमगाव, कोतेवाडा, वागदरा, किरमिटी, वडगाव, दाताळा, धानोली, शिवमडका, खडका आदी लगतचे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी हिंगणा, बुटीबोरी, डोंगरगाव, खापरी, वानाडोंगरी, नागपूर येथे शिक्षण घेत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नऊ महिन्यापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु आता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
लॉकडाऊनच्या अगोदरपासून नागपूर-वर्धा रोडवरील डोंगरगाव मार्गे गुमगाव-हिंगणा येथे एसटीच्या अनेक फे-या सुरू होत्या. त्या गुमगाव बसस्थानकावरूच पुढे जात असत. त्यामुळे बाहेरगावी शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना या फे-या सोयीच्या होत्या. परंतु आता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असल्याने अध्ययन-अध्यापन प्रत्यक्ष समजून घेण्याची आशा विद्यार्थी मनाशी बाळगून होते. परंतु एसटीअभावी विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. एसटी सुरू करण्याबाबत गुमगाव ग्रामपंचायत, पालक, विद्यार्थी व शिक्षकांमार्फत संबंधित आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रसंगी सरपंच उषा बावणे, उपसरपंच नितीन बोडणे, सामाजिक कार्यकर्ते गणपत सोनकुसळे, ग्राम विकास अधिकारी गजानन माहुलकर, मोहन कुंभारे, रोहित बोरकर, वैभव भुसारी, राकेश गुरनुले, प्रज्वल कोरडे , यश उरकुडे, सेजल गंधारे, वैष्णवी गांजुडे, पूजा शिरभात, मगुरी माकोडे आदी उपस्थित होते.