वडील धावल्याने अनर्थ टळला : पोलिसांची कारवाईसाठी टाळाटाळनागपूर : शस्त्राच्या धाकावर एका विद्यार्थ्याचे अपहरण करून आरोपींनी त्याला जोरदार मारहाण केली. या घटनेची वेळीच माहिती कळाल्यामुळे अपहृत विद्यार्थ्याचे वडील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्यामुळे आरोपी पळून गेले. आरोपींचा गुन्हेगारी अहवाल माहीत असूनही प्रतापनगर पोलीस कारवाईसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे.मोहित अनिल पाटील (वय १७) असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. तो व्हीटीसीचा १२ वीचा विद्यार्थी आहे. मोहितचे वडील बिल्डर आहेत. नेहमीप्रमाणे मोहित रविवारी सायंकाळी ट्यूशन क्लासला आला. ट्यूशन आटोपल्यानंतर मोहित खामल्यातील सिंधी कॉलनीतील आपल्या एका मित्राकडे पाणी पिण्यासाठी गेला. तलवारीच्या धाकावर मारहाणरात्री ८.३० च्या सुमारास तेथे रोहित राठोड, कार्तिक धावडे, अक्षय वाडे आपल्या साथीदारासह आले. त्यांनी मोहितला मारहाण करीतच आपल्या वॅगन आर कारमध्ये कोंबले. तेथून ते विमलताई तिडके कॉलेजजवळ गेले. येथे आरोपींनी तलवारीच्या धाकावर मोहितला जबर मारहाण केली. दरम्यान, मोहितचे अपहरण केल्याची माहिती त्याच्या मित्राने अनिल पाटील यांना सांगितली. त्यामुळे ते लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. आरोपी मोहितला मारहाण करीत असल्याचे पाहून त्यांनी दुरूनच आवाज दिला. त्यामुळे आरोपी पळून गेले. पाटील यांनी मोहितला प्रतापनगर ठाण्यात नेऊन तक्रार दिली. पोलिसांनी कलम ३६३, ३२३, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. आरोपींची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाईसाठी गंभीरता दाखविली नसल्याचा पाटील परिवाराचा आरोप आहे.यापूर्वीही केली लुटमारआरोपी रोहित राठोड याने यापूर्वीही गुन्हे केले आहेत. नगरसेवक मुन्ना यादव यांच्या मुलाला रहाटे कॉलनीत रोखून त्याने त्याची सोनसाखळी हिसकावून मारहाण केली होती. पोलिसांनी त्यावेळी त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे टाळले. त्यामुळे आता त्याने विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाणीचा गुन्हा केला. एवढे असूनही पोलिसांनी जुजबी गुन्हे दाखल केले. हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल केले नाही. मोहित अल्पवयीन असूनही बालकांच्या सुरक्षेसंबंधीच्या कायद्यानुसार गुन्हे दाखल केले नाहीत. तक्रार दाखल होताच आरोपींच्या एका मित्राने प्रतापनगर ठाण्यातील एका अधिकाऱ्यासोबत हितगुज केल्याची चर्चा आहे. यामुळे पोलिसांनी केवळ पळवून नेण्याचा आणि हातबुक्कीने मारण्याचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे.(प्रतिनिधी)
विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण
By admin | Updated: August 19, 2014 00:52 IST