नागपुरात १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:42+5:302021-03-13T04:10:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागपुरात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी ...

Strict lockdown in Nagpur from March 15 to 21 | नागपुरात १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

नागपुरात १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागपुरात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रपरिषदेत नागपुरात १५ मार्च ते २१ मार्चदरम्यान नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कडक लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.

राऊत यांनी सांगितले, नागपुरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. काल एकाच दिवशी १७०० वर रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता कडक लॉकडाऊन लागू करण्याशिवाय पर्याय नाही. यादरम्यान पूर्णत: संचारबंदी लागू राहील. कुणालाही विनाकारण बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहील. लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे आणि मास्क न घालता फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.

बंदला नागरिकांनी गांभीर्याने घेतले नाही

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक बंदी न घातला शनिवार व रविवारी बंदचे आवाहन केले होते. परंतु, नागरिकांनी या बंदला फारसे गांभीर्याने घेतले नाही. कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण सर्रासपणे फिरताना आढळून आले. वारंवार सूचना देऊनही लोकांनी याला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच एकाच दिवशी १७०० वर रुग्णसंख्या पोहोचली. शहरासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याचे आढळून आले आहे. परिणामी, प्रशासनाला नाइलाजाने कडक लॉकडाऊन लागू करावा लागत असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले.

आमदार निवासात राहणार क्वाॅरंटाईन सेंटर

आमदार निवास येथे क्वाॅरंटाईन सेंटर सुरू करण्यात येत आहे. ज्यांना घरी क्वाॅरंटाईन होता येत नाही, त्यांना येथे राहता येईल. यासोबतच डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था वनामती येथे करण्यात येईल.

११ मार्च २०२० रोजी आढळला होता पहिला रुग्ण

नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च २०२० रोजी सापडला होता. त्याला आता बरोबर एक वर्ष झाले आहे. नोव्हेंबरमध्ये परिस्थिती सुधारली होती. परंतु आता पुन्हा परिस्थिती गंभीर होत आहे. गेल्या २४ तासांत १७०० वर रुग्ण आढळून आले आहेत.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लॉकडाऊन

हा लॉकडाऊन पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणार आहे. यात महापालिकेच्या सीमेसह शहरातील सर्व पोलीस स्टेशनचा परिसरासह कामठी, जुने व नवीन हिंगणा, सोनेगाव, कोराडी, कळमना, हुडकेश्वर आदी पोलीस स्टेशन परिसराचाही समावेश राहील.

लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

शहर व ग्रामीण भागात १३१ केंद्रांवर ज्येष्ठांचे कोविड लसीकरण सुरू आहे. लसीकरण मोहीम या कालावधीतही सुरू राहील. तथापि, लसीकरण केंद्रापर्यंत ज्येष्ठांना पोहोचविण्यासाठी या कालावधीत लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

मेट्रो-आपली बस बंद, ऑटो-टॅक्सी सुरू

या काळात मेट्रो रेल्वे सेवा व आपली बससेवा पूर्णपणे बंद राहील. ज्या ग्रामीण भागात लॉकडाऊन नाही तेथील ग्रामीण भागातील बससेवा सुरू राहील. इतर बंद राहील. तसेच लसीकरण मोहीम सुरू आहे व वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवेसाठी ऑटो-टॅक्सी सेवा आवश्यक असल्याने ती सुरू राहील, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

गृह विलगीकरण नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई

गृह विलगीकरणात असणाऱ्या बाधितांनी नियम न पाळल्यामुळे स्वत:चे कुटुंब व परिसरातील नागरिकांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार पद्धतीने वागणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आकस्मिक भेटी देऊन कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील हॉटस्पॉट

नागपूर शहरात लक्ष्मीनगर, मंगळवारी, हनुमाननगर आणि धरमपेठ हे भाग हॉटस्पॉट झाले आहेत. यावर प्रशासनाची बारीक नजर राहील. यासोबतच ग्रामीण भागात सावनेर हिंगणा, काटोल रामटेक याकडेही विशेष लक्ष देण्यात येईल.

हे राहणार सुरू

वैद्यकीय, पॅरामेडिकल व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

बँक, पोस्ट कार्यालय

फळे, भाजीपाला, अंडी, मासे, वैद्यकीय सेवा, चष्म्याची दुकाने

उद्योग

शासकीय व निमशासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीसह

मार्चअखेरची सर्व कामे पूर्ण क्षमतेने

प्रसारमाध्यमांसाठी कामे करणाऱ्या प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक

लसीकरण मोहीम

खाद्यपदार्थ घरपोच सेवा

हे बंद राहील

खासगी कार्यालये पूर्णत: बंद

दारू विक्री बंद राहील (ऑनलाइन सुरू)

अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार

---------------------

नागपुरात १५ मार्चपासून लॉकडाऊन

दारू दुकाने बंद, घरपोच सेवा सुरू

लॉकडाऊनदरम्यान दारूची दुकाने व बार बंद राहतील. परंतु घरपोच सेवा मात्र सुरू राहील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे शनिवार-रविवार बंदच्या दिवशी दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिल्यामुळे प्रशासनाला नागरिकांचा असंतोष सहन करावा लागला होता.

शनिवारपासूनच दिसेल परिणाम

लॉकडाऊन १५ मार्चपासून लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा होण्यापूर्वी शहरात शनिवार-रविवार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या शनिवार-रविवारीही ती लागू आहे. परिणामी, लॉकडाऊन सोमवारपासून लागू होणार असला तरी त्याचा परिणाम मात्र शनिवारपासूनच दिसून येईल.

Web Title: Strict lockdown in Nagpur from March 15 to 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.