मैत्रिणीच्या आत्महत्येनंतर तणावात असलेल्या तरुणीने दिला जीव; २४ तासांत शहरात पाच आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 10:07 PM2023-06-15T22:07:07+5:302023-06-15T22:07:36+5:30

Nagpur News मागील २४ तासांच्या कालावधीत नागपुरात आत्महत्येच्या पाच घटनांची नोंद झाली. अजनी, पाचपावली, जरीपटका व नंदनवन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या.

Stressed young woman dies after friend's suicide; Five suicides in the city in 24 hours | मैत्रिणीच्या आत्महत्येनंतर तणावात असलेल्या तरुणीने दिला जीव; २४ तासांत शहरात पाच आत्महत्या

मैत्रिणीच्या आत्महत्येनंतर तणावात असलेल्या तरुणीने दिला जीव; २४ तासांत शहरात पाच आत्महत्या

googlenewsNext

नागपूर : मागील २४ तासांच्या कालावधीत नागपुरात आत्महत्येच्या पाच घटनांची नोंद झाली. अजनी, पाचपावली, जरीपटका व नंदनवन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या. एका घटनेत पत्नीशी वाद झाल्यानंतर आलेल्या तणावातून पतीने गळफास घेत आत्महत्या केली, तर मैत्रिणीच्या आत्महत्येनंतर सातत्याने तणावात असलेल्या एका तरुणीने टाकीच्या पाण्यात उडी घेत जीव गेला.

नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संताजीनगर येथील रहिवासी प्रियंका नंदराव सराटे (२२) हिने पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. ती घरी कुठेच न दिसल्याने तिच्या भावाने सगळीकडे शोधाशोध केली. ती न आढळल्याने भाऊ मिथुन याने नंदनवन पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रारदेखील दिली होती. पोलिसांनी शोध घेतला असता पाण्याच्या टाकीत तिचे शव आढळले. प्रियंकाचे वडील आइस फॅक्टरीत काम करतात. तीसुद्धा एका दुकानात काम करीत होती. तिच्या रूममेट मैत्रिणीने तीन महिन्यांअगोदर खोलीतच गळफास घेत आत्महत्या केली होती. तेव्हापासून प्रियंका अस्वस्थ व तणावात होती. या घटनेचा खोलवर परिणाम प्रियंकाच्या मनावर झाला. आपली मैत्रीण आपल्या स्वप्नात येते व आपल्याला बोलविते, असे ती सांगत असे. यातूनच तिने आत्महत्या केल्याचा संशय आहे. नंदनवन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगरी, नारा गाव येथील निवासी उदल सेवकराम टेंभरे (४०) यांनी घराच्या सिमेंट शीटच्या लोखंडी ॲंगलला इलेक्ट्रिक वायरच्या साहाय्याने गळफास घेतला. बुधवारी सायंकाळी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना एका खाजगी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. जरीपटका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पत्नी माहेरी गेल्याच्या तणावातून उचलले टोकाचे पाऊल

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जोशीवाडी, रामेश्वरी रोड येथील निवासी कुणाल गुलाब महतो (३२) यांचा पत्नीसोबत वाद झाला होता. पत्नी मुलांसह माहेरी गेली व त्यामुळे कुणाल तणावात आले होते. गुरुवारी मध्यरात्री १ वाजेनंतर त्यांनी घराच्या बेडरूममधील सिलिंग फॅनच्या हुकला गळफास घेतला. त्यांच्या भावाला ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना खाली उतरवून मेडिकल इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा भाऊ शुभमच्या सूचनेवरून अजनी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

उधारीच्या तणावातून तरुणाची आत्महत्या ?

पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांडापेठ येथील निवासी मिथुन मारोती सोनकुसे (२६) या तरुणाने बुधवारी घरच्या स्वयंपाकघरातील सज्जावरील लोखंडी ग्रीलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. त्याच्या पत्नीच्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मजुरीची कामे करणाऱ्या मिथुनला दारूचे व्यसन होते व त्यातून अनेकांची उधारी केली होती. त्याच तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.

दारूच्या व्यसनातून सुरक्षारक्षकाने दिला जीव

पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राकेश ढोके (५१, सिद्धार्थनगर) यांनी गुरुवारी रात्री अडीच वाजेनंतर लोखंडी खिडकीला स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांना मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या बहिणीने दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश ढोके यांना दारूचे व्यसन होते व त्यांनी अगोदरदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ते एका इस्पितळात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.

Web Title: Stressed young woman dies after friend's suicide; Five suicides in the city in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू