उमरेड : शहरातील इतवारी पेठसह जुना बैलबाजार परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अंकुश लावा. या परिसरांमधील अवैध धंदे बंद करा, या मागणीचे येथील महिलांनी उमरेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्याकडे सोपविले. जनहित संघर्ष समितीच्या संस्थापिका जैबुन्निसा शेख यांच्या नेतृत्वात महिलांनी पुढाकार घेत आपल्या समस्यांकडे लक्ष वेधले. इतवारी मुख्य परिसरात बाजारपेठ विस्तारलेली असल्याने गर्दीआड अवैध धंदे चांगलेच फोफावले आहेत. रस्त्यांवरच नको त्या ठिकाणी आपली वाहने उभी करणे. सोबतच वाहनांवर बैठक मारणे आदी प्रकारामुळे तरुण मुली, महिलांना चांगलाच त्रास सोसावा लागत आहे. शिवाय रस्त्याच्या कडेला दारूच्या नशेतच झिंगत पडून असलेल्यांचेही दृश्य नेहमीच नजरेस पडते. दरम्यान अर्धनग्न अवस्थेत पडून अश्लील शिवीगाळ करण्याचेही प्रकार वाढल्याचा आरोप महिलांनी केला आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जयश्री हुसके, जीविका हुसके, रेखा निखारे, मानसी आयतोडे, मेघा आंभोरकर, सरस्वती निखारे, आशिया शेख, फरजाना शेख, इंदुबाई ढेबुदास आदींसह पन्नासावर महिलांचा समावेश होता.
इतवारी परिसरातील अवैध धंदे बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST