लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची निर्मिती केल्यानंतर कुही येथील वनपरिक्षेत्र कार्यालय बंद करण्यात आले. त्यामुळे कुही तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत आहे. ही गैरसाेय दूर करण्यासाठी कुही येथील वनपरिक्षेत्र कार्यालय पुन्हा सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे वन राज्यमंत्री संजय राठाेड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कुही येथील वनपरिक्षेत्र कार्यालय २०१२ पासून बंद करण्यात आले आहे. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यामुळे कुही तालुक्यात वन्यजीव कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. मांढळ उपवन क्षेत्रातील रानबोडी, ठाणा, दहेगाव व चिकणा हे बीट या कार्यालयाला जाेडण्यात आली. तालुक्यातील उर्वरित बीट उमरेड कार्यालयाला जाेडण्यात आले. वन्यप्राण्यांकडून पिकांचे हाेणारे नुकसान, मनुष्यहानी, पाळीव जनावरांवरील वन्यप्राण्यांचे हल्ले यासह अन्य तक्रारी करणे तसेच पिकाच्या नुकसान भरपाईसह अन्य कामासाठी शेतकऱ्यांना ४० ते ६० किमी दूर असलेल्या उमरेडला जावे लागते.
पूर्वी तालुक्यात कुही, मांढळ व वेलतूर या ठिकाणी उपवनक्षेत्र कार्यालय होते. ती कार्यालये बंद करण्यात आल्याने कार्यालय इमारती व कर्मचाऱ्यांची शासकीय निवासस्थाने ओस पडली आहेत. कार्यालय उमरेडला असल्याने कुही तालुक्यातील राजोला, आंभोरा, कुजबा, पचखेडी, वेलतूर यासह अन्य गावामधील शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत असल्याने, कुही येथे कार्यालय सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. खा. कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, तालुका प्रमुख हरीश कडव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता.