नागपूर : गावोगाव सेवा देणारी एसटी सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीने नेहमीच जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या प्रवासी नसले तरी बियाणे, धान्य आणि औद्योगिक साहित्याची वाहतूक एसटी करीत आहे. त्यामुळे उद्योजक, शेतकरी हे एसटीने माल वाहतूक करण्यास पसंती देत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान एसटीची सेवा बंद करण्यात आली. अशा कठीणप्रसंगी एसटीने मालवाहतुकीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. खासगी वाहतूकदार टनाप्रमाणे दर आकारतात, तर एसटीकडून किलोमीटरप्रमाणे शुल्क आकारले जाते. कमी लांबीच्या मार्गावर एसटीचा खर्च कमी येतो. यामुळे उद्योग, व्यावसायिकांकडून मालवाहतुकीसाठी एसटीला प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही बस वाहतूक ठप्प आहे. अशावेळी मालवाहतुकीवर भर देण्यात आला आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत प्रामुख्याने बियाणे, धान्य, लोखंड, स्टील आणि कोविड सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बॉटल पोहोचविण्यासाठी एसटीची मदत घेण्यात आली. याशिवाय अन्य साहित्याची वाहतूकही करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात नागपूरहून एसटीचे मालवाहू ट्रक एकूण १४ हजार ८०० किलोमीटर अंतर धावले. त्यातून ५.९२ लाखांचे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात आतापर्यंत सहा कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. दर महिन्यात मालवाहतुकीचा पल्ला आणि उत्पन्नाची रक्कम वाढत असून, एसटीच्या माल वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
...........
मालवाहतुकीचे दर
१०० कि.मी.च्या आत प्रती कि.मी. ४६ रुपये
१०० ते २५० किमी ४४ रुपये प्रती कि.मी.
२५० कि.मी.च्या वर ४२ रुपये प्रती कि.मी.
खासगीपेक्षा कमी खर्च
‘एसटीने माल वाहतूक सुरू केल्यापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत एसटी महामंडळाच्या ट्रकने माल वाहतूक करण्यासाठी कमी खर्च येतो. त्यामुळे उद्योजक, शेतकरी यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी एसटीच्या माल वाहतुकीचा लाभ घ्यावा.’
अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार
...........