लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार, ३० रोजी सोयाबीनला दर्जानुसार प्रतिक्विंटल अवघा ३,३०० ते ४,२५० रुपयांदरम्यान भाव मिळाला. हा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असून, बाजारात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने जाहीर केलेला हमीभाव प्रतिक्विंटल ५,१४० रुपये असताना, प्रत्यक्षात मिळणारा दर त्यापेक्षा शेकडो रुपयांनी कमी आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दर्जा निकृष्ट
या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, बाजारात येणाऱ्या सोयाबीनला डाग पडले असून, दर्जा निकृष्ट असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सरकारी खरेदी केंद्रे अद्याप सुरू नाहीत
राज्य सरकारकडून सोयाबीन खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, व्यापारी मनमानी दर ठरवत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळावा, नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून भरपाई देण्यात यावी आणि सरकारी खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करण्याची शेतकरी संघटनांची मागणी आहे.
खर्च वाढला, उत्पादन कमी, शेतकरी अडचणीत
यंदा शेतकऱ्यांच्या एकरी सरासरी अडीच ते तीन क्विंटलच उत्पादन मिळाले. याउलट, सोयाबीन लागवडीसाठी एकरी १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अशा परिस्थितीत सध्याच्या भावात तो खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पुढील हंगामात सोयाबीन लागवड करायची की नाही, या संभ्रमात आहेत. दरवर्षी खते, मजुरी आणि इंधनाचे दर वाढतात; पण सोयाबीनचा भाव मात्र तसाच राहतो. खर्च वाढूनही दर न वाढल्याने शेतकऱ्यांची परवड होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यंदा हंगाम तीन आठवड्यांत संपण्याची भीती
नागपूर जिल्ह्यात कुही, मांडळ, उमरेड, पारशिवनी आणि मौदा या भागांत प्रामुख्याने सोयाबीनची लागवड झाली. मात्र, पावसामुळे पीक कमी आले. त्यामुळे यंदा कळमन्यात तीन आठवड्यांत सोयाबीनचा हंगाम संपेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर शेतकऱ्यांच्या नाराजीचे वारे आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी कळमन्यात सोयाबीनचा दर ४,४६० रुपयांपर्यंत गेला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा भाव कोसळून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. सध्या दररोज २ हजार ते २,५०० पोत्यांची आवक होत असून, गुणवत्तेच्या अभावामुळे दर घसरले आहेत. यावर्षी सोयाबीनचा हंगाम पुढे १५ ते २० दिवसच राहणार असून, त्यानंतर आवक बंद होण्याची भीती आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत कळमन्यात या हंगामात दररोज ५ ते ६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक व्हायची. ही आवक काही वर्षांआधी १० हजार क्विंटलपर्यंत होती. यंदा गुणवत्तेअभावी सोयाबीनला भाव मिळत नसल्याचे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजार असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे यांनी यांनी सांगितले.
Web Summary : Soybean prices plummet to ₹3,300 in Nagpur due to rain damage and lack of government support. Farmers face losses as costs rise, yields fall, and government purchase centers remain closed, leaving them reliant on private traders.
Web Summary : बारिश से हुए नुकसान और सरकारी समर्थन की कमी के कारण नागपुर में सोयाबीन की कीमतें ₹3,300 तक गिर गईं। लागत बढ़ने, उपज घटने और सरकारी खरीद केंद्र बंद रहने से किसानों को नुकसान हो रहा है, जिससे वे निजी व्यापारियों पर निर्भर हैं।