लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मदतीसाठी फोन येताच नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज (एनएफएससी)च्या इंजिनिअरनी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. घटनास्थळी पाेहोचून त्यांनी स्थानिक अग्निशमन दलाची मदत केली.
महाविद्यालयाचे निदेशक रमेश कुमार यांनी सांगितले की, घटना माहीत होताच भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना फोन करून मदत मागितली होती. फोन येताच लगेच महाविद्यालयातील इंजिनिअरना घटनास्थळी रवाना करण्यात आले. तिथे पोहोचून त्यांनी स्थानिक अग्निशमन विभागाच्या पथकासोबत मिळून काम केले. आग कशी व का लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक चौकशीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात काय झाले, हा तपासाचा विषय आहे. आग लागल्याने तिथे लागेलेले सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे जळाले आहेत. त्यातील फुटेज सुरक्षित असतील तर त्याची तपासणी केली जाईल.
बॉक्स
अद्याप लिखित काहीही नाही
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची चौकशी एनएफएससीसह व्हीएनआयटीतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यावर रमेश कुमार यांनी सांगितले की, यासंदर्भात त्यांना कुठल्याही प्रकारचा लिखित आदेश मिळालेला नाही. त्यांना ही माहिती माध्यमांकडूनच मिळाली आहे. याबाबत लिखित आदेश आल्यावरच तपास केला जाईल.