कन्हान : कांद्रीच्या जवाहरलाल नेहरू कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेले ४ रुग्ण अत्यवस्थ होते. त्यांच्या वैद्यकीय चाचणी अहवालानुसार त्यांना तातडीने व्हेंटिलेटरची आवश्यकता होती, असे सांगण्यात येत आहे. मात्र नागपूर येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याने त्यांच्यावर कांद्री येथेच उपचार सुरू ठेवण्यात आले. या कोविड केअर सेंटरमध्ये सोमवारी २९ रुग्ण होते. येथे रात्रपाळीत रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉ. प्रसाद आणि रितू नावाची नर्स होती. मध्यरात्रीच्या वेळी रितूने डॉ. प्रसाद यांना काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते, अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली. वेळीच याची दखल घेतल्या गेली असती तर अत्यवस्थ असलेल्या ४ रुग्णांचे प्राण वाचले असते, अशी चर्चा जवाहरलाल नेहरू रुग्णालयातील कर्मचारी दबक्या आवाजात करताना दिसून आले. योग्य उपचाराअभावीच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला असला तरी या घटनेनंतर रुग्णालयात उपस्थितीत असलेल्या वेकोलि आणि जिल्हा प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बोलण्यात एकवाक्यता नसल्याने दिसून आले. वेकोलि रुग्णालयात प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून हे कोविड सेंटर चालविण्यात येत आहे. या सेंटरमध्ये वेकोलिच्या सेवेत असलेले वैद्यकीय आधिकारी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेने नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी सेवा देतील असे निश्चित करण्यात आले होते, असे सांगण्यात येते. मात्र २९ रुग्ण सेंटरवर उपचारासाठी असताना येथे रात्रपाळीत केवळ एक डॉक्टर आणि एकच नर्स असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बागवान, प्रभारी ठाणेदार सुजीतकुमार श्रीरसागर पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त नातेवाईकांना शांत करीत प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही दिली. डॉ. वाघ, डॉ. मोहमंद अंसारी, डॉ. धुर्वे आदी यावेळी उपस्थित होते. दुपारी २ वाजतानंतर प्रशासकीय पूर्तता करीत कोविड गाईडलाईनुसार रुणांचे मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले.
-----------
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता वेकोलिच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयातील भौतिक सुविधा कोविड सेंटरसाठी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम आहे. या रुग्णालयात व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही. कोरोनाबाधित रुग्णाची २४ तास देखभाल करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे होती. याची पूर्तता करण्यात आली का?
सतेंद्रप्रसाद सिंग
जनसंपर्क अधिकारी, वेकोलि
----------
घटनेची चौकशी व्हावी
जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वेकोलि प्रशासनाने कोविड सेंटरसाठी रुग्णालयाची इमारत देण्याशिवाय कोणतेही सहकार्य केले नाही. मंत्री सुनील केदार यांच्या समक्ष वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर आणि नर्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही सांगितले होते. याकडे दुर्लक्ष झाले. या कोविड सेंटरवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्याय सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बर्वे यांनी सांगितले.
----------------
मृत पावलेल्या रुग्णांची प्रकृती आधीच गंभीर होती. मेयो, मेडिकल आणि खासगी रुग्णालयात बेड नसल्याने त्यांना या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल आधीच कमी असल्याने त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. मात्र नागपुरात कुठेच व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. यासाठी सातत्याने विविध रुग्णालयांशी संपर्क करण्यात आला.
डॉ. गजानन धुर्वे, निरीक्षक, कोविड केअर सेंटर
-------
या घटनेनंतर वेकोलि प्रशासन आणि जिल्हा प्रशासन केवळ चालढकल करीत आहे. कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कुणाची आहे. हे आधीच निश्चित झाले पाहिजे. ग्रामीण भागात तातडीने दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.
नरेश बर्वे, नगरसेवक तथा अध्यक्ष इंटक युनियन
------
पोलीस अधीक्षक घटनास्थळी
जवाहरलाल नेहरू रुग्णालयाच्या कोविड सेंटर येथे रुग्णांच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्यानंतर या कांद्री आणि कन्हान परिसरात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी दाखल होत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. तोडफोड करण्यात आलेल्या स्थळाची पाहणी केली. यासोबतच उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.