‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:11 PM2019-07-15T13:11:04+5:302019-07-15T13:13:46+5:30

‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय. तेव्हा पालकांनो, मुलांना वेळीच आवरा, असा मौलिक सल्ला गडचिरोली जिल्ह्यातील ‘सर्च’ या संस्थेच्या सहसंचालक पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी दिला.

'Smartphone' has become a problem for kids | ‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय!

‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय!

googlenewsNext
ठळक मुद्देराणी बंग यांचे पालकांना आवाहनवेळीच मुलांना सावरा

अभय लांजेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे आईवडील जेवणाच्या टेबलवर बसलेले आणि दुसरीकडे मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’. आई तिच्या बाळाला घास भरवते. तोंडासमोर घास आणून ठेवलेला आणि बाळ मोबाईल गेममध्ये मग्न. मध्येच त्याची इच्छा होईल त्यावेळेस त्याला घास भरविला जातो. मग मुलं सातत्याने मोबाईलमध्येच तोंड खुपसतात. कालांतराने त्यांना इतरांच्या भावना समजत नाही. संवेदना संपल्याचाच हा प्रकार वारंवार घडतो. ‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय. तेव्हा मुलांनो ब्ल्यू व्हेल, पबजी यासारख्या जीवघेण्या गेमच्या व्यसनापासून आताच सावध राहा. पालकांनो, मुलांना वेळीच आवरा, असा मौलिक सल्ला गडचिरोली जिल्ह्यातील ‘सर्च’ या संस्थेच्या सहसंचालक पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी दिला. प्रस्तुत प्रतिनिधीने घेतलेल्या विशेष मुलाखतीच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.
उमरेड येथील रितीक विवेक कोलारकर (१९) तसेच खुशी जगजित परिहार (२०) रा. हिंगणा या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे मुलं कुठे भरकटत चालली, असा सवाल करीत यात दोष पालकांचा आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. रितीक कोलारकर यास पबजीचे व्यसन जडले होते. त्यानंतर त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचारही केले. मानसोपचार तज्ज्ञांनीही देखरेख केली. त्यानंतर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. शिवाय घामगंड आजारानेही तो त्रस्त होता. यातूनच त्याच्यावर मृत्यू ओढवला. आज गल्लोगल्लीत, घरादारात पबजीचे वेड लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक व्याधीही पुढे येत आहेत. उमरेडच्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाल्याचे चित्र आहे.
अलीकडे दोन तीन वर्षांच्या मुलांनाही अगदी बिनधास्त मोबाईल दिला जातो. अशावेळी आमची मुलं-मुली किती स्मार्ट आहेत. त्याचे तोंडभरून कौतुक केले जाते. इतक्या लहान वयात टीव्हीसमोर, तासन्तास मुलांच्या हातात मोबाईल देणे या बाबी घातक आहेत. मी तंत्रज्ञानास वाईट म्हणत नाही. त्याचा उपयोग कसा करता, हे महत्त्वाचं आहे, अशी मौलिक बाबही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितली.

‘गेम’चे व्यसन महाभयंकर
चित्रपटासारखं आयुष्य सुपरफास्ट नसतं. यामुळे आपली मुलं नेमकी काय करीत आहेत, काय बघत आहेत, याकडे पालकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. सतत मोबाईलमध्येच डोकं खुपसत राहिल्यामुळे मेंदू बधिर होतो. आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. दुसऱ्यांच्या भावनाही समजत नाही, ही बाब अत्यंत धोकादायक आहे. मग खाण्यात, खेळण्यात आणि शिक्षणात आपसुकच दुर्लक्ष होतं. दारू आणि ड्रग्जपेक्षाही पबजी, ब्ल्यू व्हेलसारख्या मोबाईल गेमचे हे महाभयंकर ‘व्यसन’ आहे.

ही कम्युनिकेशन गॅप
खुशी परिहार ही मुलगी घर सोडून गेली. काय केलं पालकांनी? मुलांवर धाक नको का? संवाद पाहिजे. अशावेळी आई-वडिलांनी चर्चा करायला पाहिजे. संवादाला वेळच नाही. ही जनरेशन गॅप नाही. कम्युनिकेशन गॅप आहे. शाळा-कॉलेजमध्ये पाठवलं. शिकवणी वर्ग लावून दिले की जबाबदारी संपली. मुलांसाठी वेळ काढा. त्यांच्या गरजा समजून घ्या. ‘मागेल ते द्यायचं’ असे लाड पुरविले गेले की मग त्या मुलांना त्याच सवयी लागतात. एखाद्या प्रेमात नकार दिला की ते पचविण्याची ताकद नसते. मग हत्या नाही तर आत्महत्या घडतात. आपण समाज म्हणून आणि पालक म्हणून कमी पडत आहोत, अशीही वास्तविकता त्यांनी व्यक्त केली.

योग्यवेळी उपचार
हे व्यसन सोडविण्यासाठी योग्यवेळी उपचार महत्त्वाचे आहेत. निदान मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेले पाहिजे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. उपचारासोबतच पुन्हा चर्चा, संवाद, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पर्यायी इतर साधने उपलब्ध आहेत, याची जाणीव करून द्या. हे व्यसन आहे. पालकांच्या बसची बात नाही. कितीही सांगितलं तरी समस्या सुटणार नाही. त्यांना सायक्रॅटिक कौन्सिलिंग आणि डी-अ‍ॅडिक्शन थेरपी देणे गरजेचे आहे, अशीही बाब डॉ. बंग यांनी मांडली.

Web Title: 'Smartphone' has become a problem for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल