- योगेश पांडे नागपूर - नागपूर शहराचा वेगाने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणाऱ्या वस्त्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर सहाव्या पोलीस परिमंडळाची स्थापना करण्यास महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या परिमंडळ पाचचे विभाजन करून नव्या सहाव्या परिमंडळाची स्थापना केली जाणार आहे. कळमना आणि पारडी विभागासाठी हे नवीन परिमंडळ असेल. शहराचा भौगोलिक विस्तार, वाढती झोपडपट्टी, कायदा व सुव्यवस्थेची गरज आणि नागरी समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी या नव्या परिमंडळाची आवश्यकता असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या परिमंडळासाठी आवश्यक असलेल्या पोलीस उपायुक्त व दोन सहायक उपायुक्त पदांना सरकारने मंजुरी दिली आहे. गृह विभागाने गृह विभागाने ४२.१३ लाख इतक्या आवर्ती खर्चास तसेच ४०.९२ लाख इतक्या अनावर्ती खर्चास मंजुरी दिली आहे.
नवीन परिमंडळ तयार झाल्यानंतर, कळमना आणि पारडी या वाढत्या वसाहती असलेल्या भागात अधिक प्रभावी पोलीस यंत्रणा कार्यरत होण्यास मदत मिळेल. भविष्यात या परिमंडळात आणखी काही पोलीस ठाण्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.