पूर्वा हेडाऊ मृत्यूप्रकरण : फार्महाऊसमधून हार्डडिस्क जप्तकळमेश्वर : पूर्वा हेडाऊ मृत्यूप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिराज शेखला मनोज काटखाये प्रकरणात दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी पोलीस कोठडी संपत असल्याने पोलिसांनी त्याला कळमेश्वर न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी कळमेश्वर पोलिसांनी बीटीपी फार्महाऊस येथून हार्डडिस्क जप्त केली असली तरी या प्रकरणात कळमेश्वर पोलिसांची भूमिका एकूणच संशयास्पद आहे. तोंडाखैरी येथील बीटीपी अॅन्ड बीसीएन फार्महाऊसमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून १० सप्टेंबर रोजी पूर्वा हेडाऊचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी फार्महाऊस मालक सिराज शेखला अटक केली. त्याच्यासोबतच अन्य १३ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र सिराज शेखला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावून अन्य १३ जणांना जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणाची चौकशी करीत असताना याच फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये मनोज काटगाये याचा ७ सप्टेंबरला मृत्यू झाल्याचे उघड आले. त्यामुळे पूर्वा हेडाऊ मृत्यूप्रकरणात सिराजला जामीन मिळाला असला तरी मनोज काटगाये प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोन्ही प्रकरणाची चौकशी करीत असलेल्या कळमेश्वर पोलिसांनी मंगळवारी सिराजला फार्महाऊस येथे नेले. येथून हार्डडिस्क जप्त केली. त्यानंतर त्याला नागपूरला नेले. बुधवारी सिराजची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला कळमेश्वरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पी.डी. सावंत यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. पोलिसांनी पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र सिराजला जामीन मंजूर करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
सिराज शेखला जामीन मंजूर
By admin | Updated: September 17, 2015 03:43 IST