मेडिकल : सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाची चौकशीची मागणी नागपूर : सिकलसेल रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सोयींबाबत शासन गंभीर नाही. यातच शासकीय रुग्णालय या गंभीर रुग्णांच्या उपचाराकडेही दुर्लक्ष करीत असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या एका २४ वर्षीय सिकलसेलग्रस्त युवतीचा स्ट्रेचरवर तर ३३ वर्षीय रुग्णाला तातडीने उपचार न मिळाल्याने अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. या दोन्ही घटनेची मंत्रालयस्तरावर चौकशी करण्याची मागणी सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाने केली आहे. सायली निमगडे (२४) रा. नागपूर व पंकज डोंगरे (३३) रा. तिरोडा भंडारा अशी मृतांची नावे आहेत. सायलीची आई यशोदा निमगडे यांनी सांगितले की, ४ डिसेंबर रोजी सायलीच्या अंगात दुखायला लागले. त्याच रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तिला मेडिकलच्या अपघात विभागात नेले. तिथे डॉक्टरांनी ‘पेनकिलर’चे इंजेक्शन दिले. परंतु त्यानंतरही तिचे दुखणे सुरूच होते. रात्री १ वाजताच्या सुमारास तिला वॉर्ड क्र. ४७ मध्ये भरती केले. सोमवारी डॉक्टरांनी ‘पेन्जीन’ नावाचे इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले. परंतु परिसरात कुठेच ते मिळाले नाही. दुपारी २ वाजता इंजेक्शन मिळाले. इंजेक्शन दिल्यावर हिरव्या रंगाच्या उलट्या व्हायला लागल्या. रक्ताची सोयही करून ठेवली होती. मात्र, रक्त न देता ते परत पाठविण्यात आले. सायलीला पाणीही पचत नव्हते. त्यावेळी उपस्थित डॉ. स्वप्निलला याविषयी सांगितले असता, असे होतच असते असे सांगून त्याने दुर्लक्ष केले. मंगळवारी दुपारी सायलीला श्वास घेणे कठीण जात होते. याची माहिती डॉ. स्वप्निलला दिली. त्याने आपल्या वरिष्ठ डॉक्टरला कळवले. वरिष्ठ डॉक्टर येताच तिला आॅक्सिजन लावण्यात आले आणि लगेच वॉर्ड क्र. २४ अतिदक्षता विभागात घेऊन जाण्यास सांगितले. त्यावेळी अटेंडंट नव्हता. फोनवरून मुलाला बोलवून घेतले. सायलीला आम्ही दोघांनी उचलून स्ट्रेचरवर झोपवले. मुलाने सिलिंडर पकडले तर मी स्ट्रेचर ढकलले. पहिल्या माळ्यावरून तळमजल्यावर आणताना तिला धक्के बसत होते. तीनवेळा आॅक्सिजनचा मास्क निघाला. अतिदक्षता विभागात नेल्यावर आम्हालाच तेथील खाटेवर सायलीला झोपवावे लागले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून व्हेंटिलेटरवर ठेवले आणि काही तासातच तिच्या मृत्यूची बातमी दिली. माझी मुलगी स्ट्रेचवरच आम्हाला सोडून गेली होती. डॉक्टरांनी जर सुरुवातीपासून सायलीची गंभीर दखल घेतली असती तर ती आज या जगात असती, असेही त्या म्हणाल्या.(प्रतिनिधी)
स्ट्रेचरवरच सिकलसेल रुग्णाचा मृत्यू
By admin | Updated: December 23, 2016 01:38 IST