लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रो नागपूर मेट्रो प्रकल्पाचा सहावा वर्धापन दिवस गुरुवारी साजरा करीत असताना नागपूर विमानतळ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत फीडर सेवा म्हणजे शटल बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. महामेट्रो, मनपा आणि मिहान इंडिया लिमिटेडतर्फे संयुक्तपणे सेवा देण्यात येत आहे.
विमानतळावर उतरणाऱ्या नागरिकांना किंवा विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोने प्रवास करून आलेल्या प्रवाशांसाठी प्रदूषणरहित इलेक्ट्रिक शटल बसचा प्रवास सुलभ आणि सुखकर होणार आहे. शटल बस या मार्गावर सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत दर १५ मिनिटांनी फेऱ्या मारणार आहे. बसमध्ये लगेज ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे. बसचे भाडे सरकारी दरानुसार आहे.
खापरीकरिता फीडर सेवा सुरू
महामेट्रो आणि इंडिया पॅसिफिक ट्रॅव्हल्सच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करारानुसार खापरी मेट्रो स्टेशन ते मिहान परिसरादरम्यान मेट्रो रेल्वे फीडर सेवा गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, मिहान परिसरात विविध कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. दीक्षित म्हणाले, जास्तीत जास्त संख्येत मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी जोडण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. महामेट्रोने मनपाला शहरातील सात मार्गावर १८ बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला असून, लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. खापरी मेट्रो स्टेशन ते एम्स हॉस्पिटल, कॉन्कोर, एचसीएल, टीसीएस, मिहान येथील डब्ल्यू इमारत, ल्युपिन, हेक्सावेअर या कंपनी परिसरापर्यंत फीडर सेवा उपलब्ध राहील.